Pune : परतीच्या पावसाने बारामतीकर त्रस्त ,बाजारपेठेवरही परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati Rain Update

Pune : परतीच्या पावसाने बारामतीकर त्रस्त ,बाजारपेठेवरही परिणाम

बारामती : शहरात सकाळपासूनच सुरू झालेल्या संततधार पावसाने जनजीवन पार विस्कळीत झाले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दररोज पडणारा पाऊस ही आता लोकांसाठी डोकेदुखी ठरत असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी या पावसाने घराबाहेर पडणे लोकांना अवघड झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बारामती शहर व तालुक्यामध्ये पावसाची दैनंदिन हजेरी असते. त्यामुळे पाऊस आता कधी संपणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे. दसऱ्यानंतर बारामतीचा पाऊस संपतो, यंदा मात्र दसरा उलटून आठवडा होऊन गेला तरी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्यामुळे सर्वजण त्रस्त आहेत.

दिवाळी तोंडावर आलेली असल्याने फराळाचे साहित्य करण्यासह इतरही तयारी करण्याच्या दृष्टीने लोकांना खरेदीसाठी बाहेर पडायचे आहे, मात्र पावसाने सर्वत्र चिखल व पाणी साचत असल्याने लोक घराबाहेर पडायचे टाळत आहेत. पाऊस उघडल्यानंतर खरेदी करू अशी लोकांची भूमिका आहे.

इकडे दोन वर्षाच्या कोविडच्या संकटानंतर यंदा दिवाळीचा सण चांगला साजरा होईल या अपेक्षेने बारामती शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी केली आहे. पावसाचा व्यापारपेठेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. पाऊस लवकर संपवावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. बारामती तालुक्यातील अतिवृष्टी होत असल्याने यंदा हवामान बदलाचे परिणाम जाणवत असल्याची चर्चा सर्वत्र आहे. मंगळवारी (ता. 11) बारामती तालुक्यामध्ये अनेक गावात पावसाने जोरदार हजेरी लावली. यात सुपे 110, वडगाव निंबाळकर 118 ,मुर्टी 127 मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली. जिरायत पट्ट्यात पडलेला हा पाऊस आश्चर्यकारक मानला जात आहे. बारामती तालुक्यातील बव्हतांश गावांनी पावसाची सरासरी ओलांडली असून काही ठिकाणी सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्यामुळे आता पाऊस थांबला पाहिजे, अन्यथा पिकांची नासाडी होईल अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

मंगळवारी (ता. 12) झालेला पाऊस व कंसात आजपर्यंतचा एकूण पाऊस, मि.मी. मध्ये – बारामती- 18 (721), उंडवडी कडेपठार- 20 (500), सुपा- 110 (542), लोणीभापकर 79 (616), माळेगाव कॉलनी 15 (448), वडगाव निंबाळकर 118 (903), पणदरे 18 (403), मोरगाव 67 (715), लाटे 20 (481), ब-हाणपूर 21 (550), सोमेश्वर कारखाना 40 (669), जळगाव कडेपठार- 25 (615), आठ फाटा होळ 50 (622), मानाजी नगर 20 (447), चांदगुडेवाडी 51 (699), काटेवाडी 8 (404), अंजनगाव 13 (491), जळगाव सुपे 25 (489), सोनगाव 2 (715), कटफळ 45 (555), सायंबाचीवाडी 54 (433), मुर्टी 127 (792), मोढवे 94 (775).