पुण्यातील स्टार्टअपने ‘ईव्ही’च्या बॅटरीचे वाढविले आयुष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric-Vehicle
पुण्यातील स्टार्टअपने ‘ईव्ही’च्या बॅटरीचे वाढविले आयुष्य

पुण्यातील स्टार्टअपने ‘ईव्ही’च्या बॅटरीचे वाढविले आयुष्य

पुणे - सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या दरामुळे (Fuel Rrate) आता नागरिक ईव्ही (EV) अर्थात इलेक्ट्रिक व्हेइकलच्या (Electric Vehicle) खरेदीकडे (Purchasing) वळत आहे. मात्र, हे वाहन खरेदी करताना ते किती सुरक्षित (Secure) आहे आणि त्यातील बॅटरी (Battery) किती दिवस टिकणार हा मुद्दा आहे. पुण्यातीलच एका स्टार्टअपने यावर संशोधन करून ते पुरवीत असलेल्या वाहनांची बॅटरी सात ते १० वर्ष टिकेल याची खात्री बाळगली आहे. तसेच बॅटरीचा स्फोट होणार नाही, याची खबरदारी घेणारे तंत्रज्ञानदेखील त्यांनी विकसित केले आहे.

इतर कंपन्यांच्या तुलनेत आपण काय वेगळे देऊ शकतो यावर या स्टार्टअपच्या संस्थापकांनी लक्ष दिले. बॅटरी, चार्जर आणि वाहनाचे अ‍ॅवरेज यावर त्यांनी अनेक दिवस काम केले. तसेच वाहनाची सुरक्षितता यावर संशोधन झाले. त्यासाठी चीनमध्ये जाऊन तेथील यशस्वी आठ कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केला. जर्मनी येथील कंपनीबरोबर चार्जिंग सेंटरबाबत सामंजस्य करार केला.

इलेक्ट्रिकल वाहन यशस्वी झालेल्या देशांच्या सरकारी योजना काय आहेत, याचा अभ्यासही या स्टार्टअपने केला आहे.

डेक्स्टो (Dexto) असे या स्टार्टअपचे नाव आहे. शशिकांत कांबळे आणि रोहन कांबळे यांनी २०१८ साली या स्टार्टअपची स्थापन केली.

बेळगाव येथे इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोहन यांनी विप्रोमध्ये व्यवस्थापक पदावर काम केले आहे. तर शशिकांत कांबळे हे भारती विद्यापीठात कार्यरत होते.

ध्यास स्टार्टअपमध्ये रूपांतरित

नोकरीच्या निमित्ताने मला कॅलिफोर्निया, दुबई, जर्मनी आणि चीन या ठिकाणी काम करायला मिळाले. चीन येथे इलेक्ट्रिकल कार बनविण्यामध्ये माझा सहभागही महत्त्वाचा होता. त्यानंतर भारतात आल्यावर वाटलं की, आपण इलेक्ट्रिकल कार का निर्माण करू नये? याचदरम्यान मी शशिकांत कांबळे यांना भेटलो. माझ्या मनातील इलेक्ट्रिकल कारच्या कंपनीची कल्पना सांगितली. त्यांनाही कल्पना खूप आवडली. काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याचा आमचा ध्यास स्टार्टअपमध्ये रूपांतरित झाल्याचे रोहन यांनी सांगितले.

आम्ही बॅटरीची सात ते १० वर्षांची वॉरंटी ग्राहकांना देतो. बॅटरीचे आयुष्य वाढविण्यासाठी आम्ही अनेक संशोधन केले आहे. बॅटरीत बसविण्यात येणाऱ्या ‘बीएमएस’बाबत आमच्याकडे ग्लोबल पेटंट आहे. बीएमएस हे बॅटरी कन्ट्रोल करते. सेल जळाला तरी बॅटरी पेट घेत नाही व ती खराब होत नाही. त्यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते.

- शशिकांत कांबळे आणि रोहन कांबळे, सहसंस्थापक, डेक्स्टो

स्टार्टअपची वैशिष्ट्ये

 • बॅटरीची सात ते १० वर्षांची वॉरंटी

 • बीएमएसबाबत ग्लोबल पेटंट

 • बॅटरीची सर्व परिस्थितीत केलेली तपासणी

 • वाहनाची चेसी एक सारखी

 • वाहनाची बॉडी बदलता येते

स्टार्टअपची उत्पादने

 • स्कूटर

 • पॅसेंजर रिक्षा

 • तरकारीचे वाहन

 • चहासाठी फिरती गाडी

 • पाणीपुरीसाठी वाहन असलेला फिरता स्टॉल

 • ५०० किलोपर्यंत मालवाहू वाहन

Web Title: Pune Based Startup Extends Ev Battery Life

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top