esakal | Pune : पूजा साहित्याने सजली बाजारपेठ
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : पूजा साहित्याने सजली बाजारपेठ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणरायाच्या स्वागतासाठी पूजासाहित्याने आणि फुलांनी बाजारपेठ सजली आहे. बाप्पाच्या लाडक्या दूर्वा, जास्वंदांच्या फुलांसह नारळ, शमीची पाने, विड्याची पाने, आघाडा-केना यांची खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग सुरू आहे. त्याच्या जोडीला धूप, कापूर, सुवासिक उदबत्त्या, चंदन यांच्या विक्रीने प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.

बाप्पाच्या पूजेत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या दूर्वा मोठ्या प्रमाणावर बाजारात आहेत. लहान दूर्वा ३० रुपये जुडी, तर मोठ्या दूर्वा ४० रुपये जुडी भावाने मिळत आहे. तसेच गणेशाला प्रिय असलेल्या जास्वंदांच्या फुलांचीही मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून, १० रुपये नगाप्रमाणे ते विक्रीला आहेत. त्याच्या जोडीला गुलाब, झेंडू, शेवंती, सोनचाफा ही फुलेही ५० ते ३०० रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहेत.

तसेच विड्याची पाने, शमीची पाने, आघाडा-केना यांचीही खरेदी नागरिक करत आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी लागणाऱ्या पूजा साहित्याच्या विक्रीलाही वेग आल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. त्यात हळद-कुंकू, गुलाल, बुक्का, धूप, अगरबत्ती, अष्टगंध, कापूर, सुपाऱ्या आदींचा समावेश आहे.

हेही वाचा: सिंहगडावर सुविधा उपलब्ध करा : खासदार सुप्रिया सुळे

गणेशोत्सव हा अठरापगड जातीला आपलासा वाटणारा सण आहे. त्यामुळे कोरोनाची भीती असली तरी नागरिक खबरदारी घेऊन खरेदीसाठी येत आहेत. पूजासामग्रीला सण-उत्सवाच्या काळातच मागणी असते. यंदाही बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने मागणी वाढल्याने आमचा व्यवसाय रुळावर येतो आहे.

- संदीप बनकर, व्यावसायिक, श्रीपाद पूजा भांडार

मंडई परिसराला पसंती

मंडई व तुळशीबाग परिसरात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. पूजेसाठी लागणारे सगळे साहित्य एकाच परिसरात मिळते आणि त्याचे भावही वाजवी आहेत. तसेच फुलेही ताजी मिळत आहेत. त्यामुळे आम्ही कोंढवा येथे राहत असलो तरी खरेदीसाठी मंडई परिसरात आलो आहोत, अशी माहिती ग्राहक मुकेश देशमुख यांनी दिली.

loading image
go to top