

पुणे, ता. १४ ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी असलेली पुणे ते बीडदरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू होत आहे. गुरुवारी (ता. १७) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पुणे-बीड-पुणेदरम्यान दररोज रेल्वे सेवा सुरू होत आहे.
ही रेल्वे पुण्याहून रात्री दहा वाजून ३० मिनिटांनी सुटेल, बीडला सकाळी सहा वाजता पोहोचणार आहे. तर बीडहून रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी सुटेल, पुण्याला पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार आहे. या रेल्वेला स्लीपरचे डबे जोडले असतील. या रेल्वेचा प्रवास रात्रीचा असणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. रेल्वे बोर्डाकडून अद्याप अधिसूचना जारी केले नसले, तरीही पुणे रेल्वे प्रशासनाने नवीन रेक तयार करण्यासाठी डब्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. गुरुवारी या रेल्वेचे उद्घाटन होईल, याच उद्देशाने रेल्वे प्रशासन तयारी करीत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाला रात्रीच्या प्रवासाचा प्रस्ताव दिला आहे. शिवाय ही रेल्वे दररोज धावणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
खासगी ट्रॅव्हल्सची मक्तेदारी संपुष्टात येणार
सध्या पुणे-बीड या रस्ते मार्गावर दररोज सुमारे ५० खासगी ट्रॅव्हल्स धावतात. पुणे ते बीडदरम्यान थेट रेल्वेसेवा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होती. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजास्तव खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत असे. मात्र, थेट रेल्वे सुरू होत असल्याने प्रवाशांची ट्रॅव्हल्सचालकांच्या मनमानीतून आणि जादा दरातून सुटका होईल.