esakal | मालक म्हणाले, "तुम्ही सगळे लवकर बाहेर पळा मी आलोच"; पण ते आले नाहीत
sakal

बोलून बातमी शोधा

Vinayak Kokatnur

मालक म्हणाले, "तुम्ही सगळे लवकर बाहेर पळा मी आलोच"; पण ते आले नाहीत

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी - साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे सगळ्यांनी चहा घेतला. सगळ्यांनी आपापल्या कामाला सुरुवात केली. मी नुकतंच मशीन सुरू केलं होतं. दहा वाजण्याच्या दरम्यान जोरात आवाज झाला.मी माझ्या मशीनच्या खोलीतून बाहेर आलो. मोठी आग दिसली. महिला जोरात ओरडत पळायला लागल्या. सगळा धूर झाला होता. मी जोरात मालकाला आवाज दिला. मालक पळा लवकर असे ओरडलो. मालक रडत रडत खाली बसले आणि," तुम्ही सगळे लवकर बाहेर पळा मी आलोच" असं म्हणाले.

धूराने काही दिसत नव्हते. काही महिला मागच्या दरवाज्याकडे पळाल्या. मला पुढच्या बाजूला थोडा उजेड दिसला, मी तिकडे पळालो. मालकाला पुन्हा हाक मारली पण मालकांनी आवाज दिला नाही. रस्त्याच्या बाजूला मी भिंताला लटकलो. पुन्हा जोरात स्फोट झाला आणि आगीचे लोट बाहेर आले. हात भाजल्याने माझा धीर सुटला आणि मी वरुन खाली पडलो. माझा पाय मोडला पण जीव वाचला, पण आमचे मालक नाही वाचले असं म्हणत नांदेड येथील भिषण आगीच्या दुर्घटनेतून वाचलेला मशिन ऑपरेटर विनायक गौरीशंकर कोकटणूर (वय 39, रा. धायरी मूळ रा. सोलापूर) रडू लागला.

हेही वाचा: पुणे: अंगणवाडीसेविका भरतीला चौथ्यांदा ब्रेक

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरातील औद्योगिक वसाहतीतील भाऊ इंडस्ट्रीयल इस्टेट मधील बालाजी इंडस्ट्रीज या केकवरील शोभेची दारू(स्पार्कल कॅंडी) बनविणाऱ्या कंपनीला गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला तर दोन महिला व एक पुरुष कामगार असे तिघेजण जखमी झाले आहेत.

या आगीच्या दुर्घटनेतून वाचलेल्या व खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विनायक गौरीशंकर कोकटणूर यांनी भावूक होऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला. "मालकाने आम्हाला सगळ्यांना पळायला सांगितले पण ते स्वतः पळाले नाहीत. डोळ्यांपुढे फक्त जाळ आणि धुराचे लोट दिसत होते. ज्याला जिकडं वाट दिसल तसे सर्वजन पळत होते. मालकानी पण पळायला पाहिजे होतं. त्यांची माझ्या पोरांएवढीच लहान लहान लेकरं आहेत ओ. खुप अवघड झालं", हे सांगताना विनायक कोकटणूर यांचे डोळे पाणावले.

उपचारांचा खर्च कसा करणार?

पंधरा ते वीस फूट उंचीवरून पडल्यामुळे विनायक कोकटनूर यांच्या डाव्या पायाच्या मांडीचे हाड मोडले आहे. त्यांना नांदेड फाट्याजवळील सिंहगड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी पन्नास ते साठ हजार खर्च सांगितला आहे. घरची परिस्थिती नाजूक. तीन लहान मुले. दुर्दैवाने मालकाचेही निधन झालेले. आता दवाखान्याचा खर्च कसा करायचा? हा प्रश्न विनायक कोकटणूर यांच्यापुढे आहे.

loading image
go to top