
Pune : भीमाशंकर कारखाना १६ मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारणार
पारगाव : भीमाशंकर साखर कारखाना नवीन १६ मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारणार असून त्यासाठी ४१ कोटी रुपये खर्च करणार आहे तसेच १३७ कोटी रुपये खर्चाच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
दत्तात्रयनगर (पारगाव) ता.आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची २०२१-२२ ची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली काल शनिवारी संपन्न झाली यावेळी श्री. वळसे पाटील बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, भीमाशंकरचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर,भगवान वाघ, अनिल वाळुंज, कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, बाळासाहेब घुले, बाबसाहेब खालकर, रामचंद्र ढोबळे, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात, तानाजी जंबूकर, भगवान बोऱ्हाडे, रमेश कानडे, अक्षय काळे, ज्ञानेश्वर आस्वारे, आण्णासाहेब पडवळ, कल्पना गाढवे, मंदाकिनी हांडे, गणपतराव इंदोरे व कारखान्याचे सचिव रामनाथ हिंगे व सर्व संचालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.वळसे पाटील म्हणाले भीमाशंकरने कोरोनाचा कठीण काळातही धाडसाने कारखान्याचे विस्तारीकरण केले प्रती दिन गाळप क्षमता चार हजार मेट्रिक टनावरून सहा हजार मेट्रिक टन केली त्यामुळे मागील गाळप हंगामात सरासरी प्रती दिन साडे सहा हजार मेट्रिक टन क्षमतेने उच्चांकी गाळप झाले.
आपली एफआरपी २६८२ ठरली ऊसाच्या विक्रीतून ३१३ कोटी ४५ लाख रुपये शेतकर्यांना देऊ शकलो. सुरवातीला सहा मेगावॉट क्षमतेचा वीज प्रकल्प सुरु केला नंतर नवीन १३ मेगावॉट क्षमतेचा वीज प्रकल्प उभारला तयार होणार्या विजेच्या प्रती युनिटला शासन अगोदर ६.७० रुपये दर देत होते आता ४.७५ रुपये दर देत आहे कारखान्याचे उत्पन्न कमी होऊ लागल्यामुळे सुमारे ४१ कोटी खर्च करून नवीन १६ मेगावॉट क्षमतेचा वीज प्रकल्प उभारला जाणार आहे.
कोरोनानंतर आता लम्पीचे नवीन संकट आले आहे हंगाम सुरु झाल्यावर ऊसतोड कामगारांची जनावरे सुरक्षित ठेवण्याचे काम कारखाना व सरकारला करावे लागेल. यावर्षी पाऊस जास्त झाल्याने ऊसाचे उत्पन्न जास्त असणार आहे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार साखरेसाठी नवीन बॅग वापरावी लागेल त्यामुळे खर्च वाढणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने मागील हंगामाचा शेवटचा हप्ता किती देणार हे जरी सांगू शकत नसलो तरी ऊस उत्पादकांची दिवाळी हि निच्छित गोड होणार असल्याची ग्वाही श्री. वळसे पाटील यांनी दिली.
कारखान्याचे अध्यक्ष श्री. बेंडे प्रास्ताविकात म्हणाले गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये कारखान्याच्या इतिहासात सर्वात जास्त उच्चांकी ११ लाख ८६ हजार ४२६ मेट्रिक टन गाळप करून सरासरी ११.३८ टक्के साखर उताऱ्याने १३ लाख ५१ हजार २२० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याने देश व राज्य पातळीवरील एकूण २४ पुरस्कार प्राप्त केले आहे.
ऊस उप्तादन वाढीसाठी दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२० योजनेतून ऊस उत्पादकांसाठी विविध योजना आणल्या आहे. कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सूत्रसंचालन डॉ. सुदाम खिलारी व निलेश पडवळ यांनी केले तर आभार उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे यांनी मानले.