Pune : उपायुक्ताच्या घरी सापडली सव्वा कोटींची रोकड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
पुणे : उपायुक्ताच्या घरी सापडली सव्वा कोटींची रोकड

पुणे : उपायुक्ताच्या घरी सापडली सव्वा कोटींची रोकड

पुणे - जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी लाच घेतल्याप्रकरणी उपायुक्त तथा जिल्हा जात पडताळणी समिती सदस्याच्या घरी टाकण्यात आलेल्या छाप्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला एक कोटी २८ लाखांच्या रोकडसह दोन कोटी ८१ लाखांची मालमत्ता आढळून आली. या प्रकरणी न्यायालयाने उपायुक्तास २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य नितीन चंद्रकांत ढगे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी तक्रादाराकडे आठ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ढगे यास एक लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक नाडगौडा आणि सूरज गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ढगे यांच्या घराची झडती घेतली. त्यामध्ये घरात एक कोटी २८ लाख ४९ हजारांची रोकड आणि इतर मालमत्ता मिळून दोन कोटी ८१ लाख ८९ हजारांची मालमत्ता आढळून आली. याशिवाय बॅंक खाती तपासण्यात येत असून, या प्रकरणाची उघड चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती नाडगौडा यांनी दिली.