
पुणे : साखर, गहू, गव्हाचे पीठ आणि आता तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कांदा आणि बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर कर लावला आहे. तांदळाच्या निर्यातीवर लादलेल्या वीस टक्के करामुळे तांदूळ निर्यातच ठप्प होणार आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागताच प्रसार माध्यमे महागाई वाढल्याच्या बातम्या देतात. त्याचा परिणाम म्हणून केंद्र सरकार निर्यात बंदी करते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. केंद्राचे हे धोरण शेतकरी विरोधी आहे. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले. ‘शेतीमालांवर घातलेली निर्यात बंदी, तांदूळ, कांद्यावर लादलेला निर्यात कर. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या घोषणा करायच्या पण, प्रत्यक्षात मदत करायची नाही, अशा शेतकरीविरोधी धोरणांमुळे राज्यासह देशात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. केंद्र सरकारची धोरणे शेतकरी विरोधी आहेत.
राज्यात अतिवृष्टी झाली, आता माघारी मोसमी पाऊस सुरू आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. पण, या नुकसानीची दखल कुणी घेत नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर कुणी जात नाही. केवळ आर्थिक मदतीच्या घोषणा होतात, पण, प्रत्यक्षात मदत मिळत नाही. त्यामुळे तोट्यात गेलेल्या शेतकऱ्यांचे पीककर्ज थकीत राहते आणि शेतकरी आत्महत्या करतात. हे चित्र बदलण्यासाठी धोरणांत बदल केला पाहिजे असेही पवार म्हणाले.
वेगाने लसीकरण करा
राज्यात लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मागील वर्षी लम्पी त्वचा रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राज्यात राबविली होती. त्यामुळे आपल्याकडे यंदा प्रादुर्भाव कमी आहे. राज्यस्थान, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर लसीकरण मोहीम राबविली पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.