गळ्यात बोर्ड लावून आंदोलन करा - चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडल्याने आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याबाबत पाटील यांनी आव्हान यांच्यावर टीका केली.

गळ्यात बोर्ड लावून आंदोलन करा - चंद्रकांत पाटील

पुणे - चित्रपटगृहात स्वतःचे पैसे खर्च करून गेलेल्या नागरिकांना बाहेर काढणे योग्य नाही. तुम्हाला एखादा चित्रपट आवडला नाही, तर तुम्ही चित्रपटगृहाबाहेर गळ्यात फलक लावून आंदोलन करा व चित्रपट पाहू नका, असे आवाहन करा, ज्यांना प्रतिसाद द्यायचा ते देणार नाहीत, अशा शब्दात पालकमंत्री व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडल्याने आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याबाबत पाटील यांनी आव्हान यांच्यावर टीका केली. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बंद पाडणे, नागरिकांना बाहेर काढणे काढणे योग्य नाही. तुम्हाला एखादा विषय आवडला नाही. हा संघर्षाचा विषय आहे का? कायदा हातात घेतल्यानंतर जी शिक्षा व्हायची ती होणारच.

सरकार सत्तेतून गेल्याचं सहन होत नसल्याने संघर्ष करण्याचा आव्हाड प्रयत्न करत आहेत, असे पाटील सांगत अटकेचे समर्थन केले. दरम्यान आव्हाड यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे', अशी टीका केली होती. त्यावर पाटील म्हणाले, ‘तुम्ही म्हणाल तोच इतिहास काय? तुम्हाला पाहिजे ते मांडायला हुकूमशाही आहे का? ही दादागिरी चालणार नाही.’

संभाजी राजेंबद्दल आदर पण...

संभाजीराजे छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटातील दृष्यांवर आक्षेप घेत आरोप केले त्याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, 'संभाजीराजे यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. मात्र, त्यांच्याप्रमाणेच चित्रपट निर्मात्यालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या निर्मात्यांकडून इतिहास चुकीचा मांडला जात असल्यास त्यांनी जगजागृती करावी.