पुणेकर म्हणतात.... आंतरराष्ट्रीय विमानतळ तातडीने हवाच ! International Airport | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Airport
पुणेकर म्हणतात.... आंतरराष्ट्रीय विमानतळ तातडीने हवाच !

पुणेकर म्हणतात.... आंतरराष्ट्रीय विमानतळ तातडीने हवाच !

पुणे - शहरासाठीचा आंतराष्ट्रीय विमानतळ (International Airport) तातडीने व्हावा, अशी भावना पुणेकरांनी ‘सकाळ’कडे (Sakal) शुक्रवारी व्यक्त केली. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. पुण्यासारख्या शहराला स्वतःचा आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही, ही शरमेची बाब असल्याचीही भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

‘हवाई दला’ने पुरंदरमधील नव्या जागेच्या विमानतळाला दिलेले ‘ना हरकत’ प्रमाणपत्र रद्द केल्याची माहिती नुकतीच उघड झाली. या पार्श्वभूमीवर विमानतळाचा गेल्या २० वर्षापासून सुरू असलेल्या प्रवासाचा आढावा ‘सकाळ’ने घेतला. त्या बाबत सकाळच्या व्हॉटसअप क्रमांकावर (८४८४९७३६०२) प्रतिक्रिया पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

- प्रभाकर धावडे (उत्तम नगर) - आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी केंद्र सरकारकडून कोणतीच अडचण नाही. खऱ्या अडचणी स्थानिक आहेत. ‘सकाळ’च्या बातमीत म्हटल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी मतभेद बाजूला ठेऊन एकत्र आल्यास विमानतळ नक्कीच होईल.

- आदित्य गायकवाड (धनकवडी) - आयटी, औद्योगिकनगरी आणि आता स्मार्ट सिटीचे बिरूद मिरविणाऱ्या पुण्याला स्वतःच्या हक्काचे विमानतळ नसणे ही लाजीरवाणी बाब आहे. विमानाचे उड्डाण होण्याऐवजी जागेच्या किंमतीची उड्डाणे होत आहे. यातच लोकप्रतिनिधींना रस आहे असे दिसते.

- राजन बी. चे. (बिबवेवाडी) - पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होत नाही, याचे कारण राजकीय आहे. कुरघोडीच्या राजकारणामुळे एखादी चांगली योजना मागे पडते. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुण्याची भरभराट होईल. मात्र, त्यासाठी सर्वपक्षीय रेटा हवा.

- धोंडप्पा नंदे (वानवडी) - चाकण-राजगुरुनगर, गेल्या पाच वर्षांत पुरंदर अशी विमानतळाच्या जागेची कागदावर बरीच उड्डाणे झाली पण प्रत्यक्षात विमानतळ बाबत ठोस निर्णय झाले नाही. राजकारण बाजूला ठेऊन पुण्यामध्ये नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधून मुंबई विमानतळावरील भार कमी करण्याची गरज आहे.

हेही वाचा: पुणे: रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने परदेशी अल्पवयीन मुलीवर बलात्कार

- प्रकाश फुलारे (हडपसर) - बस्स झाला आता खेळ खंडोबा विमानतळाचा! 2018 च्या योजनेची अंमलबजावणी करायला हवी. अन्यथा हा आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊच शकत नाही. श्रेय वादावर परिसराची प्रगती थांबली आहे.

- रेणुका कुलकर्णी (रहाटणी) - आंतरराष्ट्रीय विमानतळ ही बदलत्या काळाची गरज आहे. विकासाचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांना फायदा देणारा आहे, ह्या दृष्टीकोणातून सरकारने विचार करुन त्वरीत निर्णय घेऊन नवीन वर्षात नवी सुरुवात करावी.

- संदीप कुतवळ (कोथरूड) - पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पूर्णतः राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. दरम्यान मुंबईच्या पनवेलजवळील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्णत्वास आले आहे.

- अॅड. किरण कदम - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत ‘सकाळ’मधून सतत पाठपुरावा केला जातो, याबाबत आपले अभिनंदन. माझ्या मते हे विमानतळ पूर्वीच्याच जागी म्हणजे पारगाव,खानवडी येथे झाले पाहिजे.

१) ही जागा पुण्यापासून जवळ आहे.

2) या जागेपासून जवळच सोलापूर, हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग आहे.

3) या जागेपासून जवळच मध्य रेल्वेचे उरुळीकांचन रेल्वे स्टेशन आहे.

4) सर्वात महत्वाचे म्हणजे ही जागा समुद्रसपाटी पासून थोडीशी उंचावर आहे. त्यामुळे विमानाचे लँडिंग व टेक ऑफ साठी ही जागा योग्य वाटते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneAirport
loading image
go to top