वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 pune traffic

सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

पुणे : सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या चौकातील सिग्नलमध्ये सुसूत्रता नसल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यावर कार्यवाही व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. सिंहगड रस्त्यावरील मुख्य सर्वच चौकांमध्ये नियमित वाहतूक कोंडी होत आहे. दांडेकर पूल चौक, पानमळा, गणेश मळ्यापासून ही वाहतूक कोंडी सुरू होते. राजाराम पुलाच्या पुढे विठ्ठलवाडीपासून यात भर पडतच जाते. विठ्ठलवाडी कमानीच्या पुढे विश्रांतीनगरच्या चौकात पर्यायी रस्त्याच्या मार्गाने वाहतूक वळते.

परंतु पुढे मुख्य सिंहगड रस्त्याला वरद सोसायटीपासून वाहतूक कोंडीस सुरुवात होते. हिंगण्यात आत जाणाऱ्या सर्व गल्ल्यांच्या तोंडाशी वाहतूक कोंडी होते. त्यानंतर हिंगणे चौक, आनंदनगरचा भा. द. खेर चौक, माणिक बाग चौक, पुढे माणिकबाग डीपी रस्ता, वडगाव फाटा, वडगाव उड्डाण पुलाच्या खाली आणि त्यानंतर पुढे धायरी फाटा या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. सकाळी सुमारे नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते.

हेही वाचा: गुंड सोन्या धोत्रे अखेर 'स्थानबद्ध'

"मी शिक्षक असून दररोज विठ्ठलवाडी येथे शाळेत ये-जा करावी लागते. परंतु सिग्नल यंत्रणेत सुसूत्रता नसल्याने प्रत्येक चौकात थांबत थांबत यावे लागते. त्यामुळे वेळ जातो. शिवाय वाहतूक कोंडीदेखील होते."

- विलास बनसोडे, नागरिक, नांदेड सिटी

"आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही वाहतूक समस्या सोडवण्यासाठी प्रशासन, पोलिसांना सहकार्य करतो. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रक दिव्यांमध्ये सुसूत्रता असणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही."

- अश्विन शिंदे, अध्यक्ष, रिजन ट्राफिक फाउंडेशन

"सिंहगड रस्त्याला दोन सिग्नलमधील अंतर भिन्न आहेत. त्यामुळे सुसूत्रता आणणे कठीण होते. तज्ज्ञांच्या मदतीने यात काही सुधारणा करता येणे शक्य झाल्यास त्वरित करण्यात येईल."

- नंदकिशोर शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

Web Title: Pune Citizens Suffer Due To Traffic Congestion

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newspune traffic