esakal | पुणे : लसीकरणासाठी मांडवांचा घाट

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
लसीकरणासाठी मांडवांचा घाट
sakal_logo
By
ज्ञानेश सावंत @SSDnyaneshSakal

पुणे - पुणेकरांना सहजासहजी लस मिळेना, महापालिकेकडे लशींचे पुरेसे डोस नाहीत, लसीकरण केंद्रांवर लोक हेलपाटे मारताहेत... अन्‌ महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी लसीकरणासाठी जागोजागी मांडव टाकण्याचा आग्रह धरलाय. त्यावर आठ-दहा कोटींच्या निविदा काढण्याची तयारी चालविली आहे. पहिल्या टप्प्या वडगावशेरी व येरवडा क्षेत्रीय कार्यालयांसाठी एक कोटी ११ लाख रुपयांचा मांडव आणि दुरुस्तीच्या कामांच्या निविदा काढल्या आहेत. नगरसेवकांचा विरोध नको म्हणून, त्यांच्या कार्यकर्त्यांना कंत्राट देण्याची सोयही अधिकारी करीत आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून महापालिकेचा लसीकरणावर भर आहे. त्यासाठी खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांत १५० ठिकाणी केंद्र उघडले आहे. या केंद्रांवर लोकांसाठी सुविधा अपेक्षित आहेत. त्या उभारल्या आहेत. परंतु, महापालिकेच्या काही केंद्रांत मांडवाची गरज दाखवून, तो टाकण्याचा निर्णयही झाला आणि त्यासाठीच्या निविदा काढल्या. मुळात काही इमारतीत केंद्र व पोर्च असताना मांडवासाठी खर्च होत आहे. पुढील सहा महिन्यांसाठी मांडव टाकण्याचे महापालिकेचे नियोजन असल्याचे समजते.

हेही वाचा: पुणे : रुग्णांना मोठा दिलासा; अखेर शहराला मिळाले ५,९०० रेमडेसिव्हीर

पावसाळ्यात उपयोग होणार का?

नगररस्ता-वडगावशेरी आणि येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गतच्या मांडव आणि दुरुस्तीच्या कामांसाठी सुमारे १ कोटी ११ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. अशा प्रकारे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी पुणेकरांच्या खिशातून किमान आठ-दहा कोटी रुपये जाण्याची भीती आहे. जिथे मांडव टाकणार आहे, ती जागा किती?, कोणत्या स्वरूपाचा मांडव अपेक्षित आहे?, पावसाळ्यात मांडवाचा उपयोग होईल का?, हे प्रश्‍न अनुत्तरीत आहेत.

आर्थिक ऐपत नसतानाही...

कोरोनाची साथ आणि लॉकडाउनमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. तिजोरीत आजघडीला शंभर कोटी रुपयेही नसल्याचे सांगण्यात येत आहे. आर्थिक ऐपत नसतानाही हा खर्च गरजेचा आहे का?, या प्रश्‍नावर वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी बोलायला तयार नाहीत.

लस घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना सुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यातूनच अत्यावश्‍यक कामे करण्यात येणार आहेत. मात्र, चुकीच्या पद्धतीने किंवा महागड्या निविदा काढल्या असतील, तर त्या रद्द करू. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या जातील.

- संजय गावडे, उपायुक्त, महापालिका