Water Saving : पुणे शहरात रोज एक कोटी लिटर पाण्याची बचत; प्रशासनाचा दावा pune city daily 1 crore liter water saving administrative | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune water supply

Water Saving : पुणे शहरात रोज एक कोटी लिटर पाण्याची बचत; प्रशासनाचा दावा

पुणे - महापालिकेच्या पाणी पुरवठा यंत्रणेत ४० टक्के पाण्याची गळती होत असताना समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मीटर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रोज एक कोटी लिटर पाण्याची होणारी गळती आत्तापर्यंत थांबविण्यात यश आले आहे, असा दावा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे. दरम्यान पाणी मीटरचा तुटवडा कमी झाल्याने शहरात पुन्हा एकदा मीटर बसविण्याचे काम सुरू झाले असून, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.

शहरातील सर्व भागात समान पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेतर्फे २४०० कोटी रुपये खर्च करून समान पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. गेल्या पाच वर्षापासून या योजनेचे काम सुरू असून, आत्तापर्यंत सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या योजनेअंतर्गत ३ लाख १८ हजार मीटर बसविले जाणार आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत सुमारे १ लाख १० हजार मीटर बसवून झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सेमिकंडक्टर चिपचा तुटवडा असल्याने गेल्या वर्षभरापासून महापालिकेच्या मागणी प्रमाणे मीटर उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे हे काम जवळपास ठप्प झाले होते. आता मीटर उपलब्ध होत असल्याने पुन्हा एकदा या कामाला गती आली येईल असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

शहराला खडकवासला धरण प्रकल्पातून रोज १४७० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो, पण यात ४० टक्के पाणी गळती होत असल्याने पुणेकरांच्या हक्काचे पाणी जमिनीतच मुरत होते. महापालिकेने बंगले, सोसायट्यांना १ लाख १० हजार मीटर बसवलेच. तसेच मुख्य जलवाहिन्यांवर २५० बल्क मीटर बसविण्यात आले आहेत. त्यातून पाणी गळती शोधण्यास मदत झाली आहे. मुख्य जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे मीटर रिडींगवरून समोर आल्याने तेथे दुरुस्ती करण्यात आली आहे. रोज एक कोटी लिटर पाण्याची नासाडी प्रशासनाने थांबविली आहे.

‘सोसायट्या, बंगल्यांना पाणी मीटर बसविल्यानंतर लगेच त्यानुसार बिल येणार नाही. पण यानिमित्ताने पाण्याच हिशोब ठेवणे शक्य होत आहे. जलकेंद्रातून सोडलेले नागरिकांपर्यंत किती पोहचते हे मीटरमुळे लक्षात येत हे. मीटरमधून चोरी, गळती व अन्य कारणांमुळे दररोज होणारी गळीत थांबविल्याने रोज एक कोटी लिटर बचत करण्यास यश आले आहे. ज्या भागात मीटर बसवलेले नाहीत, तेथे मीटर बसवले जाणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे.’

- विक्रम कुमार, आयुक्त

पर्वती जुना जलशुद्धीकरण प्रकल्प पाडणार

महापालिकेचा सध्या अस्तित्वात असलेले जलशुद्धीकरण केंद्र सुमारे ५० वर्ष जुने आहे. त्यावर अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. पण या प्रकल्पाचे आयुष्यमान संपत आल्याने त्याच प्रकल्पाच्या शेजारी ३५० एमएलडी क्षमतेचे नवे जलशुद्धीकरण केंद्र बांधलेजाणार आहेत. त्यासाठी सुमारे १२५ कोटीचा खर्च अपेक्षीत आहे. याचा प्रस्ताव लवकरच पूर्वगणन समितीपुढे येणार आहे. असे विक्रमकुमार यांनी सांगितले.