Garden : पुणे शहरातील उद्यानांचंच झालंय ‘खेळणं’...!

शिक्षणाचे माहेरघर, आयटी, ऑटोमोबाईल हब अशी पुणे शहराची ओळख निर्माण झालेली आहे. त्यात आता उद्यानांचे शहर म्हणूनही पुण्याचा उल्लेख केला जातो.
Garden Condtition in Pune
Garden Condtition in PuneSakal
Summary

शिक्षणाचे माहेरघर, आयटी, ऑटोमोबाईल हब अशी पुणे शहराची ओळख निर्माण झालेली आहे. त्यात आता उद्यानांचे शहर म्हणूनही पुण्याचा उल्लेख केला जातो.

पुणे - वर्षातून एकदा मिळणारी मोठी उन्हाळ्याची सुटी लागली की बच्चेकंपनीची पावले आपोआप उद्यानांकडे वळतात. धम्माल, मजामस्ती, खेळणं-बागडणं असं बरंच काही या सुटीच्या काळात होत असतं. मात्र शहरासह उपनगरांतील उद्यानातील तुटलेली खेळणी, पिण्याच्या पाण्याचा अभाव, अस्वच्छ स्वच्छतागृह, कचरा अशा समस्या पाहून त्यांचा हिरमोड होत आहे. दरवर्षी महापालिका उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असली, प्रत्यक्षात मात्र स्थिती धक्कादायक असल्याचे वास्तव समोर आले आहे.

शिक्षणाचे माहेरघर, आयटी, ऑटोमोबाईल हब अशी पुणे शहराची ओळख निर्माण झालेली आहे. त्यात आता उद्यानांचे शहर म्हणूनही पुण्याचा उल्लेख केला जातो. सारसबाग हे पुण्यातील पहिले उद्यान असून, १७५० मध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी हे उद्यान व कृत्रिम तलाव विकसित केला होता. स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये महापालिकेने छत्रपती संभाजी उद्यान, कमला नेहरू उद्यानांची निर्मिती केली. त्यानंतर शहराच्या विविध भागांत उद्याने उभी राहत गेली. तेव्हापासून आत्तापर्यंत २०२३ पर्यंत २१० उद्याने विकसित झाली असून, या उद्यानांचे एकूण क्षेत्रफळ ६५० एकर इतके आहे. सध्या पाच उद्यानांचे काम सुरू असून, यापैकी चार उद्याने या वर्षात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.

उद्यानांची संख्या वाढली असली तरी संभाजी उद्यान, कमला नेहरू उद्यान, पु. ल. देशपांडे उद्यान यासह काही मोजक्या उद्यानांची स्थिती चांगली आहे. इतर ठिकाणी उद्यानांची देखभाल करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

अनेक ठिकाणी बाक, कचरा पेटी, खेळणी, नळकोंडाळे, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याचा अभाव यासह अनेक प्रकारची दुरावस्था झाल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक या ठिकाणी रोज जातात; पण त्यांच्याकडून सुधारणा करण्याकडे लक्ष दिले जाते, दोन ते तीन दिवसांत दुरुस्ती केली जाते, असा दावा अधिकारी करत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे होत नसल्याचेच दिसून आले आहे.

प्रकाश नारायण बहिरट उद्यान, गोखलेनगर

  • लहान मुलांची खेळणी व व्यायामाचे साहित्य तुटलेले आहे.

  • स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता केली जात नाही. कोंडाळे बसवले, तिथे अस्वच्छता असते.

  • जॉगिंग ट्रॅकवर पालापाचोळा पडलेला असतो.

  • उद्यानातून नाला जातो; मात्र तो स्वच्छ केला जात नाही. डासांचे प्रमाण वाढले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, अप्पर-बिबवेवाडी

  • उद्यानात मुलांची खेळणी आहेत; परंतु दगड, मातीमुळे मुलांना खेळण्याचा आनंद घेता येत नाही. मुले पडून जखमी होतात.

  • पिण्याच्या पाण्याची टाकी बंद आहे.

  • स्वच्छतागृहाचे पाइप तुटलेले असल्याने ते बंद आहे. त्यामुळे महिलांची कुचंबणा.

  • सकाळी-सायंकाळी सुरक्षारक्षक असतात, रात्रीच्या वेळी नसल्यामुळे मद्यपींचा अड्डा होतो.

मोहनराव भिडे उद्यान, अभिरुची मॉल, वडगाव

  • उद्यानाचे क्षेत्र भव्य असूनही अर्धवट विकास.

  • अनेक ठिकाणी राडाराडा, झाडीझुडपे वाढलेली

  • ट्रॅकवर गवत आलेले असल्याने गैरसोय

  • वॉकिंग ट्रॅकही अर्धवट असल्याने नागरिकांना त्रास

दुर्गामाता उद्यान, सुपर-बिबवेवाडी

  • उद्यानाला कचराकुंडीचे स्वरूप आलेले आहे.

  • लहान मुलांच्या खेळण्यात कचरा, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत.

  • पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही.

  • स्वच्छतागृह नाही, सुरक्षारक्षक खोलीचा वापर स्वच्छतागृह म्हणून. त्यामुळे परिसरात दुर्गंधी.

  • सुरक्षारक्षक नाहीत, त्यामुळे उद्यान मद्यपींचा अड्डा

नारायण रायकर उद्यान, धायरी

  • एक हजार चौरस फूट जागेत उद्यान बांधण्याचा ‘विक्रम’ धायरीतच पहायला मिळतो.

  • या उद्यानाकडे जाणारा रस्ता कमालीचा चढ-उताराचा असल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्रास

  • मोजक्या लोकांसाठी असलेले हे उद्यान बहुसंख्य जनतेसाठी असून नसल्यासारखे आहे.

  • लेन नं. ए २० आणि २१ दरम्यान उद्यानासाठी विस्तृत क्षेत्रफळावर आरक्षण आहे.

  • संबंधित भूखंड कोणत्याही विकासकामाविना पडून आहे.

  • नऱ्हे गावात एकही उद्यान नाही. येथे जागा आरक्षित आहे की नाही असा नागरिकांना प्रश्न

डॉ. श्यामराव कलमाडी उद्यान, घोरपडे पेठ

  • कलमाडी सुरक्षारक्षक व देखरेख करणारे कोणी नाही.

  • साठलेला पालापाचोळा नियमित उचलला जात नाही.

  • स्वच्छ्तागृहाची सोय नाही.

  • पाटोळे उद्यानात मुलांसाठी खेळण्याचे साहित्य नाही.

  • स्वच्छ्तागृहात पाणी नसल्याने ते बंद ठेवण्यात आले आहे.

  • ओपन जिमचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहे.

  • व्यायाम शाळा साहित्याअभावी गेल्या अनेक वर्षांपासून बंद

राणी लक्ष्मीबाई, जे. जे. उद्यान, एमजी रस्ता

  • स्वच्छतागृह, वीज, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.

  • लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहे.

  • पाण्याचे फाउंटन पाण्याअभावी बंद

  • विजेची व्यवस्था नसल्याने सायंकाळी अंधार

  • उद्यानाबाहेर हातगाड्यांचे अतिक्रमण, त्यांच्याकडे मात्र विजेची व्यवस्था

  • अंधाराचा फायदा घेत मद्यपींचा अड्डा भरतो

शहीद हेमंत करकरे उद्यान, सातववाडी

  • उद्यानातील पिण्याच्या पाण्याची नादुरुस्त

  • स्वच्छतागृह पाण्याविना अस्वच्छ, सांडपाण्याचा साठा

  • बसवलेली काही खेळणी नादुरुस्त झाली आहेत

  • मुलांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

  • उद्यानातील प्राण्यांच्या प्रतिकृती तुटून पडल्या आहेत.

  • बैठकव्यवस्था, दिवाबत्ती नादुरुस्त

  • पदपथ व वॉकिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे.

शांताबाई एकनाथ चरवड उद्यान, वडगाव बुद्रुक

  • उद्यानाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात फळभाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण

  • स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा

  • लहान मुलांसाठीदेखील गैरसोय

डॉ. राममनोहर लोहिया उद्यान, मगरपट्टा चौक

  • पट खराब झाला आहे.

  • स्वच्छतागृहात पुरेसे पाणी नाही.

  • कारंजे नादुरुस्त आहे.

  • प्रवेशद्वारावर फिरत्या व्यावसायिकांच्या वाहनांचा त्रास

श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यान, घोरपडे पेठ

  • स्वच्छतागृहात लाइटची व्यवस्था नाही.

  • कमी दाबाने पाणी असते.

  • उद्यानात असणाऱ्या निळे फुले जलतरण तलावात वीज व्यवस्था नाही.

मुंढव्याची ७० वर्षांपासून उपेक्षा

मुंढवा, केशवनगर परिसरात महापालिकेने एकही उद्यान उभारलेले नाही. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची उद्यानांअभावी उपेक्षा होत आहे. मुंढवा महापालिकेत १९५२ मध्ये समाविष्ट करण्यात आले. या घटनेला सत्तर वर्षे उलटली. या कालावधीत मुंढव्याने नगरसेवक, महापौर, उपमहापौर पदे उपभोगली; परंतु महापालिका येथे एकही उद्यान उभारू शकलेली नाही. केशवनगर हे गेल्या सहा वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट करण्यात आले. मात्र पालिकेने उद्यानासाठी पाऊल उचलले नाही. केशवनगरमध्ये पालिकेची नव्वद एकर गायरान जमीन आहे. त्यावर उद्यान उभारावे, अशी मागणी होत आहे.

येत्या वर्षात काळेपडळ, अभिरुची मॉल, हडपसर आणि विमाननगर येथील उद्याने पूर्ण विकसित होऊन नागरिकांसाठी उपलब्ध होतील. सर्व उद्याने सुस्‍थितीत आहेत. सुविधा व खेळण्यांची दुरावस्था झाली असेल तर लगेच दुरुस्त केली जाते. नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांचा विकास आराखडा अद्याप अंतिम झालेला नाही.

- अशोक घोरपडे, अधीक्षक, उद्यान विभाग

श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यानात दहावी, बारावी तसेच स्पर्धा परीक्षार्थी अभ्यासासाठी येत असतात. काही ठिकाणी उजेड, तर काही ठिकाणी अंधार अशी स्थिती आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री अंधाराचा फायदा घेत मद्यपी, नशा करणाऱ्यांचा वावर असतो. गेल्या पाच वर्षांत संपूर्ण प्रभागात सव्वाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होऊनही उद्यान अद्यावत झालेले नाही.

- सुजाता शेलार, महिला अध्यक्षा, आलवसा फाउंडेशन

पिण्यासाठी व स्वच्छतागृहातदेखील पाण्याची व्यवस्था नसल्याने महिलांची कुचंबणा होते. अस्वच्छता असल्याने उद्यान परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. व्यायामासाठी असलेले साहित्य तसेच लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य पूर्णपणे तुटलेले आहे.

- उषा केंचनगुड, अध्यक्षा, नवचैतन्य हास्ययोग परिवार

शहरासह उपनगरांतील उद्यानांवर महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र देखभाल-दुरुस्तीअभावी या उद्यानांची दुरवस्था झाल्याचे दिसून आले आहे. ना पिण्याचे पाणी, ना स्वच्छतागृह, ना पुरेशा सुविधा, त्यामुळे चिमुकल्यांसह पालकांनी पालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com