पुणे शहर फेरीवाला समितीच्या निवडणूक रंगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election news

पुणे शहर फेरीवाला समितीमध्ये २१ सदस्य असतात, त्यापैकी आठ सदस्य हे पथारी व्यावसायिक असतात. या ८ जागांच्या निवडणूकीसाठी ११५ इच्छुकांनी अर्ज नेले होते.

Hawkers Committee Election : पुणे शहर फेरीवाला समितीच्या निवडणूक रंगणार

पुणे - शहर फेरीवाला समितीतील आठ जागांसाठी निवडणूक होत असताना एकूण ३७ जणांचे अर्ज आले आहेत. यामध्ये सर्वाधिक चुरस ही सर्वसाधारण गटातील दोन जागांसाठी असून, त्यासाठी २२ जणांचे अर्ज आले आहेत. तर अनुसूचित जमाती (महिला) जागेची निवडणूक बिनविरोध झाली असून, भीमाबाई लाडके या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

शहर फेरीवाला समितीमध्ये २१ सदस्य असतात, त्यापैकी आठ सदस्य हे पथारी व्यावसायिक असतात. या ८ जागांच्या निवडणूकीसाठी ११५ इच्छुकांनी अर्ज नेले होते. त्यापैकी ५० जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्जांच्या छाननीत ७ अर्ज अवैध ठरले. अर्ज छाननी आणि आक्षेपांवरील सुनावणीनंतर चाळीस उमेदवार शिल्लक राहीले आहे. अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेसाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोन अर्ज तांत्रिक कारणांनी बाद झाले. त्यामुळे लाडके यांचा एकच अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

सर्वसाधारण गटाच्या दोन जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहे. सर्व साधारण गटाच्या महिलेसाठी आरक्षीत एका जागेसाठी पाच अर्ज आलेले आहेत. तर अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी तीन, नागरिकांचा मागसवर्गीय प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन, अल्पसंख्याक प्रवर्गातील महिलांच्या एका जागेसाठी तीन आणि दिव्यांगांच्या एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत.

या प्रत्येक जागेसाठी वेगवेगळ्या मतपत्रिका आहेत. निवडणुकीची तयारी सुरू असून ३०० कर्मचारी यासाठी नियुक्त केले आहेत. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमधील ३२ मतदान केंद्रांवर४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर घोले रस्त्यावरील ऑर्ट गॅलरीत मतमोजणी होणार आहे.

निवडणुकीसाठी २८ लाखाची रक्कम मंजूर

फेरीवाला समितीच्या निवडणुकीसाठी २८ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. निवडणूक प्रक्रिया, स्टेशनरी, कर्मचारी भत्ते, भोजन, वाहन व्यवस्था आदींसाठी हा निधी खर्च केला जाणार आहे, असे जगताप यांनी सांगितले. दरम्यान, या निवडणुकीसाठी ३९ लाखाचा निधी मागितला होता, पण स्थायी समितीने २८ लाख रुपये मंजूर केले.

टॅग्स :puneelectionhawker