
पुणे - शहरातील होर्डिंग सुरक्षीत आहेत की नाही याची तपासणी व्यावसायिकाकडून तपासणी करून त्याचे अहवाल सादर करा असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी सर्व परिमंडळ उपायुक्तांना दिले होते. मात्र, स्ट्रक्चरल आॅडिटला होर्डिंग व्यावसायिकांनी ठेंगा दाखविला आहे. आकाश चिन्ह विभागाकडे एक अहवाल प्राप्त झालेला नाही. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या परिमंडळ उपायुक्तांना आता कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अवकाळी पावसात अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा बळी गेला. पुण्यातही प्रत्येक रस्त्यावर, चौकात इमारतीवर, मोकळ्या जागेत मोठेच्या मोठे होर्डिंग उभे आहेत. त्यातील अधिकृत २ हजार ४८५ आहेत. तर १ हजार ४०० होर्डिंग अनधिकृत आहेत. त्यावर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही, त्याच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी परिपत्रक काढले आहे.
हवामान विभागाने पुणे शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या वादळात होर्डिंग पडून जिवीत हानी, वित्तीय हानी होऊ शकते, वाहतुकीचा खोळंबा होऊ शकतो. या घटना टाळण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी पुन्हा एकदा स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात सादर करावा. जे व्यावसायिक अहवाल सादर करणार नाहीत, त्यांचे होर्डिंग अनधिकृत समजून त्यांना नोटीस देऊन होर्डिंग काढून टाकण्याची कार्यवाही सुरू करावी. तसेच अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना प्रामुख्याने वाहतूक अडथळा ठरणारी व धोकादायक झालेले काढून टाकावेत. आकाश चिन्ह विभागाच्या उपायुक्तांनी याच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवून स्ट्रक्चरल आॅडिटचे अहवाल आहे आहेत की नाही याचा दैनंदिन अहवाल सादर करावा असे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
डॉ. खेमनार यांनी हे परिपत्रक १८ एप्रिल रोजी काढले होते. त्यानंतर ते आकाश चिन्ह विभागाकडून परिमंडळाचे उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त, आकाशचिन्ह परवाना निरीक्षक यांना पाठवून योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले होते. मात्र, याकडे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. आकाशचिन्ह विभागाकडे एकाही होर्डिंगचा स्ट्रक्चरल आॅडिट केल्याचा अहवाल सादर झालेला नाही. अतिरिक्त आयुक्तांनी आदेश देऊन जवळपास दीड महिना होत आला तरी कार्यवाही न केल्याने परिमंडळाच्या उपायुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.
‘शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश दिले होते. पण मुदतीमध्ये एकही अहवाल आकाशचिन्ह विभागाला प्राप्त झाले नसल्याने परिमंडळाच्या उपायुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. जे होर्डिंग धोकादायक झाले आहेत ते काढून टाकणे आवश्यक आहे.’
- माधव जगताप, उपायुक्त, आकाश चिन्ह विभाग