पुणे पोलिसांची धडक कारवाई; रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर केले गुन्हे दाखल!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य नागरीकांना संचार करण्यास मनाई आहे. असे असतानाही रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणाऱ्या, शहरात विनाकारण फिरणाऱ्यावर संचार मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे.

पुणे : शहरातील कोरोनाबाधीतांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी नियमांची कडक अंमलबजावणीला सुरु केली आहे. शुक्रवारी रात्रीपासून दररोज शहरात सर्वत्र नाकेबंदी वाढवित नागरीकांची चौकशी केली जात आहे. त्यानुसार, रात्रीच्यावेळी शहरात संचार मनाई आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करणाऱ्या 97 जणांवर तर विनापरवानगी फिरणाऱ्या 69 अशा 166 जणांवर पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले.

- राज्यातील 'या' भागात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्यानं दिला इशारा!

शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज 800 ते 900 पर्यंत कोरोनाबाधीत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य, जिल्हाधिकारी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र संचार मनाई आदेश काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर नागरीक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याचे आणि सार्वजनिक ठिकाणावर गर्दी करत असल्याचे चित्र आहे. तसेच प्रतिबंधित नसलेल्या भागात देखील रुग्णसंख्या वाढत आहे. 

यादृष्टीने पोलिस प्रशासनाने नागरीकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने आपल्या कामात सातत्य ठेवण्यात सुरुवात केली. त्यानुसार, "नागरीकांचे दैनंदीन जीवन सुसह्य व्हावे, यासाठी लॉकडाऊन कालावधीत 1 जुलै पासून शिथीलता देण्यात आली होती. मात्र कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करने, मास्क परिधान करणे गरजेचे आहे," असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सांगितले आहे.

- युवकांसाठी महत्त्वाची बातमी; आता पुणे झेडपीने सुरू केली 'कमवा व शिका' योजना!

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीपासून पोलिसांनी शहरात पुन्हा नाकेबंदी करुन नागरीकांची चौकशी करण्यास सुरुवात केली. रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य नागरीकांना संचार करण्यास मनाई आहे. असे असतानाही रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणाऱ्या, शहरात विनाकारण फिरणाऱ्यावर संचार मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. याविषयी पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे म्हणाले, "नागरीकांनी कोरोनाची सद्यस्थिती समजून घ्यावी. अत्यावश्यक सेवा वगळता रात्रीच्यावेळी नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. आपण कुठल्या कामासाठी घराबाहेर जात आहोत, याचे पुरावे स्वत:जवळ ठेवावेत. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे."

- यंदा इंजिनीअरिंगला प्रवेश वाढणार; नियमांमध्ये शिथिलता आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली!

पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई

* विनापरवाना संचार करणाऱ्या व्यक्ती - 69
* विनामास्क संचार करणाऱ्या व्यक्ति    - 102
* रात्री 10 ते पहाटे 5 मधील कारवाई   - 97
* साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई - 184
* वाहने जप्त - 178
* ट्रिपल सीट कारवाई - 131
* सिग्नल तोडणे - 110
* विरुद्ध दिशेने वाहन चालविणे - 57
* पदपथावर अतिक्रमण-31
* बेदरकारपणे वाहन चालविणे - 57
* नाकेबंदी ठिकाणे - 94
* नेमलेले पोलिस अधिकारी/कर्मचारी - 422

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune City Police have registered cases against 166 peoples who roaming in city without reason at night