Classical Dance : शास्त्रीय नृत्यात मुलांचा वावर दुर्मीळच

आजही शहरातील शास्त्रीय नृत्य शिकवणाऱ्या कोणत्याही वर्गात गेल्यास १५ ते २० मुलींमागे एक मुलगा, असे प्रमाण दिसून येते.
Classical Dance
Classical Dancesakal

पुणे - कथक, भरतनाट्यम, कुचिपुडी, ओडिशी अशा कोणत्याही भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील महान कलाकार म्हटल्यावर पं. बिरजू महाराज, केलुचरण महापात्रा, वेदांत सत्यनारायण अशा पुरुष कलाकारांची नावे लगेच डोळ्यांसमोर येतात. शास्त्रीय नृत्य म्हणजे ‘स्त्रैण’, ते फक्त स्त्रियांनीच करायचे, हा समज छेदणारी या कलाकारांची कारकीर्द. मात्र असे असले तरी आजही हा समज लोकांच्या मनातून फारसा पुसला न गेल्याची वस्तुस्थिती आहे.

आजही शहरातील शास्त्रीय नृत्य शिकवणाऱ्या कोणत्याही वर्गात गेल्यास १५ ते २० मुलींमागे एक मुलगा, असे प्रमाण दिसून येते. अनेक नृत्य अकादमींमध्ये तर एकही मुलगा नसल्याचेही चित्र आहे. शहरातील नृत्यगुरूंमध्ये महिला गुरूंची संख्या अधिक आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्यक्षेत्रात पुरूषांच्या प्रमाणात ‘गुणात्मक वाढ’ झाली असली तरी ‘संख्यात्मक वाढ’ मर्यादितच आहे. एकीकडे पुरुषप्रधान क्षेत्रात स्त्रिया आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असताना या स्त्रीप्रधान क्षेत्रात पुरुषांची संख्या वाढण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

शास्त्रीय नृत्यशैलींमध्ये दडलेला आशय हा बहुतेककरून स्त्रीप्रधान असल्याने त्याची अभिव्यक्तीही स्त्रीसुलभ आहे. या कारणानेदेखील मुले शास्त्रीय नृत्याकडे लवकर वळत नाहीत. पण दूरचित्रवाणीवरील नृत्य कार्यक्रमांमुळे गेल्या १५ वर्षांत ही परिस्थिती काहीशी बदलली. कारण, या कार्यक्रमांमध्ये दृश्यस्वरूप का होईना, पण शास्त्रीय नृत्यप्रकार हाताळले जातात. मात्र अजूनही मुलांच्या संख्येत वाढ होण्यासाठी खूप वाव आहे.

- डॉ. परिमल फडके, भरतनाट्यम नर्तक

Classical Dance
Hording : पुणे शहरासह ग्रामीण भागातही होर्डिंग मृत्यूचे सापळे

बदलासाठी हे करणे गरजेचे

  • शास्त्रीय नृत्य करणाऱ्या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा

  • शास्त्रीय नृत्य केवळ स्त्रीप्रधान, हा समज खोडून काढण्यासाठी प्रयत्न

  • त्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्र आदींच्या माध्यमातून प्रयत्न

  • शाळा, महाविद्यालयांमधून शास्त्रीय नृत्याची आवड असणाऱ्या मुलांना प्रोत्साहन

  • नृत्य शिकणाऱ्या मुलांसाठी उपजीविकेच्या अधिक संधींची निर्मिती

चित्र हळू हळू बदलतेय

ज्येष्ठ कथक नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते म्हणाले, ‘‘पूर्वीच्या काळी कलाकारांना खूप संघर्ष करावा लागत असे, संधीही कमी उपलब्ध होत्या. मी नृत्य शिकलो त्या काळी महाराष्ट्रात मुले नृत्य शिकत नसत; पण आता चित्र हळू हळू बदलत आहे. संधी वाढल्याचा हा परिणाम आहेच. विद्यापीठीय शिक्षणात याचा समावेश झाल्याने मदत झाली आहे.’’

Classical Dance
Pune News : लिंग गुणोत्तरात पुणे जिल्ह्यातील ५७५ ग्रामपंचायती ‘रेड झोन’मध्ये

सामाजिक दबावही कारणीभूत

शास्त्रीय नृत्य शिकणाऱ्या पुरुष कलाकारांना सामाजिक दबावदेखील झेलावा लागतो. सगळ्या मुलीच असलेल्या वर्गात जाऊन नृत्य शिकण्यास मुले बिचकतात. लास्यप्रधान नृत्यामुळे अनेकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अवमानकारक टिप्पणी केली जाते. आजही आपल्या समाजात विवाह करताना पुरुषाकडे उत्पन्नाचे ठोस साधन असावे, अशी अपेक्षा असते. कुटुंबाचा चरितार्थ चालण्याची अपेक्षा पुरुषांकडूनच केली जाते. त्यामुळे शास्त्रीय नृत्यासारख्या ठोस उपजीविकेची खात्री नसलेल्या क्षेत्रात येण्याला मुले पसंती देत नाहीत.

समज विनाकारण रुजला

ज्येष्ठ कथक नृत्यांगना व गुरू शमा भाटे म्हणाल्या, ‘दोन प्रमुख कारणे यामागे दिसतात. एक म्हणजे महाराष्ट्राला आपली अशी शास्त्रीय नृत्यशैली नाही. कथक नृत्यशैली ही उत्तरेतून आणि भरतनाट्यम नृत्यशैली दक्षिणेतून महाराष्ट्रात आली आणि रुजली. त्यामुळे जसे उत्तरेत किंवा दक्षिणेत प्रत्येक घरात एक मूल शास्त्रीय नृत्य शिकते, तसे आपल्याकडे होत नाही. त्यात दुसऱ्या कारणाची भर पडली, ती म्हणजे सामाजिक दृष्टिकोन. शास्त्रीय नृत्यशैली या ‘स्त्रैण’ आहेत, त्यात ‘पुरुषी’ काहीच नाही, असा एक समज विनाकारण रुजला. त्यामुळे साहजिकच या क्षेत्रात येणाऱ्या मुलांची संख्या कमीच राहिली. गेल्या १०-१५ वर्षांत ही परिस्थिती काहीशी बदलते आहे, मात्र अजूनही मुलांची संख्या मुलींच्या तुलनेत नगण्यच आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com