पुण्यात थंडी गायब; उकाड्यात वाढ | Weather | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Temperature
पुण्यात थंडी गायब; उकाड्यात वाढ

पुण्यात थंडी गायब; उकाड्यात वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर आणि परिसरातून थंडी गायब झाली आहे. ऐन हिवाळ्यात होणाऱ्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सध्या किमान तापमानात ही वाढ दिसून येत आहे. परिणामी पुणे शहरात उकाडा काही प्रमाणात वाढला आहे. शुक्रवारी शहरात २१.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. सरासरीच्या तुलनेत ७ अंश सेल्सिअसने वाढ झाली होती.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किमान तापमानात सातत्याने घट नोंदली गेली. किमान तापमान हे १५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदले जात होते. मात्र, त्यानंतर शहरातील किमान तापमानात लक्षणीय वाढ होत गेले. सध्या शहर आणि परिसरात सामान्यतः ढगाळ वातावरण कायम राहणार असून पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांची थंडीची प्रतिक्षा कायम राहणार आहे.

जिल्ह्यातील बदलत्या वातावरणामुळे शेतकरी देखील हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील काही भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे काही प्रमाणात नुकसान होत आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा: काळजी वाढली ! पुणे जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्येत वाढ

राज्यात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर कोकणात काही भागात पाऊस पडला. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. नीचांकी तापमान १७.५ महाबळेश्‍वर येथे नोंदले गेले.

राज्यात पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सध्या पूर्व मध्य अरबी समुद्रापासून पश्‍चिम मध्य प्रदेशापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत असून राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाची नोंद होत आहे.

पुणे शहरातील किमान तापमानात या आठवड्यात सातत्याने वाढ होत आहे. सध्या पुणे शहर आणि परिसरावर ढगाळ वातावरणाचे सावट कायम आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस शहरातील किमान तापमानात घट होण्याची कोणतेही शक्यता नाही. मात्र, २४ ते २५ नोव्हेंबरपासून शहर आणि परिसरात किमान तापमानात घट होण्यास सुरवात होऊ शकते. त्याचबरोबर मध्‍य महाराष्ट्रात ही किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरवात होईल.

- अनुपम काश्‍यपी, हवामानशास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग

loading image
go to top