esakal | Pune : गणेशचित्र असलेल्या टपाल तिकिटांचा संग्रह
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : गणेशचित्र असलेल्या टपाल तिकिटांचा संग्रह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘‘भारतीय टपाल खात्याने गणेशचित्रांची टपाल तिकिटं काढलेली आहेतच; पण इतरही काही देशांमध्ये तशी तिकिटं प्रकाशित करण्यात आली, हे विशेष. ब्रिटिश राजवटीत आपल्या अनेक संस्थानिकांनी गणपतीची चित्रं असलेले मुद्रांक दस्त वापरले,’’ ही अद्भुत माहिती पुण्यातील संग्राहक विनायक आवटे यांनी दिली आहे.

- नीला शर्मा

क्षण बहराचे

आवटे यांच्या संग्रही गणेशचित्र असलेल्या तिकिटं व मुद्रांक दस्तांची संख्या तब्बल सात हजारांपेक्षा जास्त आहे. ते म्हणाले, ‘‘शालेय विद्यार्थी असताना जमदग्नीबाईंनी एकदा छंदाबद्दल सांगितलं. त्याने प्रेरित होऊन मी टपाल तिकिटं जमवू लागलो. महाविद्यालयीन काळात ही आवड आणखी वाढली. नंतरच्या काळात भरपूर भ्रमंती करायला मिळाली. सांगली, कोल्हापूर, कोलकता, चेन्नई, अहमदाबाद आदी ठिकाणच्या भटकंतीमुळे माझ्या संग्रहात नित्य नवीन भर पडत गेली.

सांगलीच्या संस्थानाने गणपतीला पंतप्रधान मानून त्याचं चित्र असलेलं नाणं जारी केलं होतं. एकेका संस्थानाचं कौटुंबिक विभाजन होऊन निरनिराळी संस्थानं नव्याने निर्माण झाली. महसूल गोळा करण्यासाठी त्यांनी नवीन तिकिटं व दस्त काढले. प्रत्येकाच्या या सामग्रीत विविधता आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील कुरुंदवाड संस्थानाच्या मुद्रांक दस्तावरील गणेशाकृती वेगळी जाणवते. या दस्तावर कानडी भाषेत मजकूर आहे.’’

हेही वाचा: Pune : डॉ. बबन जोगदंड यांना पर्यावरणमित्र पुरस्कार

आवटे यांनी पुढे सांगितलं की, भारतीय टपाल खात्याने मागे एकदा शुभेच्छापत्रांची मालिका काढली, त्यांवर गणपतीची चित्रं होती. ती पाठवताना पाकिटावर लावण्यासाठी आवर्जून गणेशचित्रांचीच तिकिटं काढली होती. काही देशांनी तेथील भारतीय नागरिकांचा आदर राखत व भारताशी असणाऱ्या संबंधांचा सन्मान म्हणून गणपतीचं चित्र असलेली टपाल तिकिटं प्रकाशित केली.

सिंगापूरमध्ये तर टपाल तिकीट वापरलं गेल्याचा शिक्काच मुळी गणपतीच्या चित्राचा केला होता. आपल्याकडे दक्षिण भारतात, सातव्या-आठव्या शतकातील नाण्यांवर एका बाजूला गणपती व दुसऱ्या बाजूला संबंधित राजाची माहिती आढळते. अशी तांबे व पितळ धातूत घडवलेली नाणी माझ्याकडे आहेत.

थायलंडमध्ये दहा बाथ या किमतीचं नाणं चलनात वापरलं गेल्याचं उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे. नव्वदच्या दशकात गणेश चतुर्थीनिमित्त अॉस्ट्रेलियात गणेशचित्र असलेलं नाणं संग्राहकांसाठी काढण्यात आलं होतं. इंडोनेशियाच्या चलनात, गणपतीचं चित्रं असलेली नोट समाविष्ट केली होती.

गणपतीच्या चित्रांचा उपयोग केलेल्या तिकिटं, नाणी आदींचा संग्रह करताना, संबंधित प्रदेशांच्या सामाजिक इतिहासाचं थोडंफार दर्शन घडलं. संग्रह करण्याच्या छंदाचा हाही एक फायदा. भारतावर ब्रिटिशांची सत्ता असताना काही संस्थानिकांना त्यांनी, आपापल्या सीमेपुरते आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्वतःचे मुद्रांक दस्त तयार करण्याचे अधिकार दिले होते. अशा ७०० संस्थानिकांपैकी अनेकांनी गणेशचित्रांची तिकिटं काढली होती. माझ्याकडे ३०० संस्थानांची तिकिटं व मुद्रांक दस्त आहेत.

- विनायक आवटे, संग्राहक

loading image
go to top