सरपंचपदांच्या निवडीला पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत स्थगिती; इतर तालुक्यांत ठरल्यानुसार कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 February 2021

- ११ तालुक्यांमधील सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडी ९ आणि १० फेब्रुवारीला 
- खेड, मावळ तालुक्यांमधील निवडींना १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती 

पुणे : जिल्ह्यातील खेड, मावळ, शिरूर आणि बारामती या चार तालुक्यांतील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडींना १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. हे चार तालुके वगळता उर्वरित ९ तालुक्यांमधील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, त्या निवडी येत्या ९ आणि १० फेब्रुवारी रोजी ठरल्यानुसार होणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी दिले. 

Success Story: नोकरी सांभाळत 'ती' झाली ‘सीए’; एकत्र कुटुंबाची मिळाली साथ!​

जिल्ह्यातील एकूण ७४६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच झाल्यानंतर सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीचे आदेश देण्यात आले होते. खेड तालुक्यातील मेदनकरवाडी, बिरदवडी, नाणेकरवाडी, भोसे, मावळ तालुक्यातील परंदवडी, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर आणि बारामती तालुक्यातील निंबूत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाल्या होत्या.

त्याच्या सुनावणीअंती ग्रामपंचायतींच्या याचिकाकर्त्यांनी मंगळवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता सुनावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले. तसेच, या चार तालुक्यांतील सरपंच आणि उपसरपंचपदांच्या निवडी १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगित ठेवाव्यात, असे आदेशात नमूद केले आहे. 

'भारतरत्नांची चौकशी करणारी रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत'; देवेंद्र फडणवीस भडकले​

या चार तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ९ तालुक्यांमधील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचपदांच्या निवडी यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार घ्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार हवेली, मुळशी, भोर, वेल्हा, इंदापूर, दौंड, जुन्नर, आंबेगाव आणि पुरंदर या तालुक्यांमधील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचपदांच्या निवडी ९ आणि १० फेब्रुवारी रोजी होणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Collector informed about selections of Sarpanch and Deputy Sarpanch of Gram Panchayats