Pune : चौकशीसाठी समिती नेमली; पण कार्यभार कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation
पुणे : चौकशीसाठी समिती नेमली; पण कार्यभार कायम

पुणे : चौकशीसाठी समिती नेमली; पण कार्यभार कायम

पुणे - स्मशानभूमीमध्ये विद्युत विषयक काम न करता बोगस बिल सादर करून एक कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न महापालिकेत झाल्याचे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अखेर चार सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. मात्र, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आदेश देऊन देखील या खात्यातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना पदावरून अद्यापही दूर करण्यात आलेले नाही.

मे. आशय इंजिनिअर्स अँड असोसिएट्स या ठेकेदार कंपनीने कोरोनाच्या काळात कोथरूड येथील स्मशानभूमी येथे २४ लाख ७५ हजार, वैकुंठ स्मशानभूमी येथे २४.८२ लाख, हडपसर येथील अमरधाम स्मशानभूमीत २४.७२ लाख आणि बाणेर येथील स्मशानभूमीत २३.७८ लाख रुपयाची कामे केल्याचे बिल सादर केले. यावर विद्युत विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र, आॅडिटच्या वेळेत हे सर्व बिल बोगस असून,निविदा नसतानाही कामे केल्याचे दाखविण्यात आले असल्याचे समोर आले. याची चौकशी केली असता या अधिकाऱ्यांनी आमच्या सह्या खोट्या आहेत असा दावा केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: महिलेशी असभ्य वर्तन करणा-यास एक वर्षे कैदेची शिक्षा

याप्रकरणाची चौकशी करावी व यादरम्यान या खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर महापौर मोहोळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांचा कार्यभार काढा असे आदेश दिले, पण याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. यामध्ये दक्षता विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे अध्यक्ष आहेत. तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, अधिक्षक अभियंता रामदास तारू याचा समावेश आहे.

अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, ‘‘बोगस बिलांची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून ३ डिसेंबरपर्यंत चौकशी अहवाल सादर करावा लागेल. चौकशी अहवालानंतर या खात्यातील अधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला जाईल. या कालावधीत त्यांना चौकशी समितीपुढे सर्व पुरावे सादर करावे लागतील.

loading image
go to top