

प्रफुल्ल भंडारी : सकाळ वृत्तसेवा
दौंड, ता. १ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) निवडणुकीत दौंड तालुक्याला संचालकपदाच्या दोन जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुसऱ्या जागेसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कोणाला संधी देणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील विभाजन आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होणाऱ्या या निवडणुकीसाठी दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप सावध पावले टाकत आहेत.
बहुतांशी क्षेत्र बागायती असलेल्या दौंड तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांशी पर्यायाने मतदारांशी थेट संपर्क प्रस्थापित होतो. राजकीय स्थान भक्कम करण्याकरिता बॅंकेचे संचालकपद महत्वाचे आहे. त्यामुळे तालुक्यातील महायुतीमधील काही नेते सक्रिय झाले आहेत. महाविकास आघाडीचे पदाधिकारी मात्र निवडणुकीच्या हालचालींपासून लांब असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ‘अ’ गटात बॅंकेचे ज्येष्ठ संचालक व माजी आमदार रमेश थोरात इच्छुक आहेत. ते १९८४पासून बॅंकेचे संचालक असून, त्यांनी सहा वेळा अध्यक्षपद भूषविले आहे. या गटातील १२६ मतदारांपैकी बहुतांश मतदार त्यांच्या बाजूने असल्याचे मानले जाते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना पुन्हा संधी दिल्यास त्यांची सलग नवव्यांदा संचालकपदी निवड होण्याचा मार्ग सुकर होईल.
भाजपचे आमदार व बॅंकेचे माजी संचालक राहुल कुल हेदेखील ‘अ’ गटातून उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. डिसेंबर २०२१ मधील निवडणुकीत भाजपपुरस्कृत अभिमन्यू गिरमकर यांनी माघार घेतल्याने रमेश थोरात बिनविरोध निवडून आले होते. पक्षाच्या आदेशानुसार कुल किंवा त्यांच्या पत्नी कांचन कुल निवडणूक लढवू शकतात.
दौंड विधानसभा मतदारसंघातून आमदार राहुल कुल यांनी २०१४ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाकडून, तर २०१९ आणि २०२४ मध्ये भाजपकडून विधानसभा निवडणूक जिंकत रमेश थोरात यांचा सलग तीनदा पराभव केला. राज्यात महायुती असली, तरी दौंड मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू आहे. त्यासाठी तालुक्याला दोन संचालकपदे देऊन पाठबळ दिले जाण्याची शक्यता आहे. दौंड तालुक्यात राष्ट्रवादी पक्षात सर्व काही आलबेल नाही, परंतु आपल्या दुफळीमुळे विरोधक डोईजड होऊ पाहत आहेत, हे लक्षात आल्याने मतभेद विसरून पदाधिकारी दौंड नगरपालिका, जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकांच्या निकालानंतर एकदिलाने बॅंकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. बॅंकेची निवडणूक अटीतटीची असल्याचे कारण देत पदावरील व्यक्ती किंवा प्रस्थापितांना संधी दिली जाते. त्यामुळे प्रमुख पक्षांकडून नव्या चेहऱ्यास संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
दुसऱ्या जागेची मागणी
अजित पवार यांच्या सूचनेनुसार मागील दोन निवडणुकांत पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, पक्षशिस्त पाळत दोघांनीही त्यांच्याच सूचनेनुसार विनाशर्त माघार घेतली होती. मागील निवडणुकीत दोन जागांची मागणी असूनही थोरात यांना संधी मिळाली होती. बदलती राजकीय समीकरणे आणि आगामी निवडणुका लक्षात घेता यंदा दुसऱ्या जागेची मागणी जोर धरत आहे. पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास जगदाळे आणि नागवडे ताकदीने निवडणूक लढविण्यास तयार आहेत. त्यामुळे दुसऱ्या जागेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याबाबत दौंड तालुक्यात औत्सुक्य वाढले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.