esakal | Pune : जिल्ह्याचा कोरोनाबाधित दर राज्यात सर्वाधिक
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : जिल्ह्याचा कोरोनाबाधित दर राज्यात सर्वाधिक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्याचा साप्ताहिक कोरोनाबाधित दर (पॉझिटिव्हिटी रेट) आजही राज्यात सर्वाधिक आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्याचा कोरोनाबाधित दर ६.३३ टक्के इतका आहे. याउलट राज्याचा हा दर केवळ २.६७ टक्के एवढा आहे. कोरोनाबाधितांच्या दराची टक्केवारी पाहता, पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळला नसल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे पुणेकरांनी गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

आजघडीला राज्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी २५.८९ टक्के एकट्या पुणे जिल्ह्यातील असल्याचे राज्य आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ३१ ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या आठवड्यातील राज्यातील कोरोना रुग्णांचा आढावा मांडणारा साप्ताहिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात या आठवड्यातील राज्यातील जिल्हानिहाय सक्रिय कोरोना रुग्ण संख्या, राज्यातील एकूण सक्रिय रुग्ण संख्या, कोरोनाबाधितांचा जिल्हानिहाय साप्ताहिक सरासरी दर दिला आहे.

या आठवड्यात राज्यात ४७ हजार ६९५ सक्रिय कोरोना रुग्ण होते. यापैकी एकट्या पुणे जिल्ह्यात १२ हजार ४०९ रुग्ण होते. गेल्या तीन दिवसात रुग्णांची ही संख्या २ हजार ४७० ने कमी झाली आहे. सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एकूण ९ हजार ९३९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्यात अनुक्रमे सर्वाधिक कोरोनाबाधित दरांमध्ये सांगली जिल्हा दुसऱ्या तर, नगर तिसऱ्या क्रमांकावर आहे. सांगली जिल्ह्याचा कोरोनाबाधित दर ५.५९ टक्के आणि नगर जिल्ह्याचा ५.३५ टक्के आहे.

हेही वाचा: गृहणींना दिलासा; खाद्यतेलाचा डबा ५० रुपयांनी स्वस्त

कोरोनाबाधित दरवाढीची कारणे

 1. रोजगाराच्या निमित्ताने होणारे स्थलांतर

 2. रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी वाढलेली अनावश्‍यक गर्दी

 3. कोरोना निर्बंधांचे / नियमांचे उल्लंघन करणे

 4. मास्कचा व्यवस्थित वापर न करणे

 5. सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर थुंकण्याच्या घटनांत झालेली वाढ

 6. मास्कचा सुरक्षिततेसाठी नव्हे तर केवळ दंड टाळण्यासाठी होणारा वापर

 7. लग्न, अंत्यविधी आणि सांस्कृतिक व राजकीय समारंभांना होणारी गर्दी

कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी अजूनही कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. शिवाय, यासाठी नागरिकांनी सॅनिटायझरचा नियमित वापर, मास्कचा योग्य वापर, सामाजिक अंतर राखणे आणि लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करून घेणे, या चतुःसूत्रीचा अवलंब केला पाहिजे.

- डॉ. भगवान पवार,

जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे

बचावासाठी काय काळजी घ्यावी

 1. मास्कचा हनुवटीवरील वापर टाळावा, मास्कचा योग्य वापर हवा

 2. वारंवार हात धुवावेत

 3. प्रवासात, घराबाहेर पडताना सॅनिटायझर वापरावा

 4. बाहेर, कार्यालयात दोन व्यक्तींत पुरेसे अंतर राखले जावे

 5. सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळावे

loading image
go to top