esakal | गृहणींना दिलासा; खाद्यतेलाचा डबा ५० रुपयांनी स्वस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Food Oil

गृहणींना दिलासा; खाद्यतेलाचा डबा ५० रुपयांनी स्वस्त

sakal_logo
By
प्रवीण डोके

पुणे - ऐन सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलाच्या (Food Oil) दरात (Rate) घट होणार आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) आयात शुल्कात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. आयात शुल्क ५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात १५ लिटरच्या डब्यामागे ५० ते ६० रुपयांची घट होणार आहे.

मागील वर्षभरात खाद्यतेलाचे दर दुप्पट झाले. परिणामी, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. केंद्र सरकारने मागील महिन्यातही खाद्य तेलावरील आयात शुल्कात घट केली होती. ३० सप्टेंबरपर्यंत कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क ३०.२५ टक्क्यांवरून २४.७ टक्के केले तर रिफाइंड सोया तेल आणि सनफ्लॉवर तेलावरील आयात शुल्कही ४५ टक्क्यांवरून ३७.५ टक्के केले आहे. रिफाइंड पाम तेलावरील आयात शुल्क ४१.२५ टक्क्यांवरून ३५.७५ टक्के केले आहे.

हेही वाचा: SPPU : अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी हवा धोरणात्मक निर्णय

सध्या सुरू असलेले सण-उत्सव तसेच हॉटेल, केटरिंग, खाणावळी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुणे, मुंबईसह देशातून खाद्यतेलाची मागणी वाढली आहे. या काळात दरात घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे मार्केट यार्डातील तेलाचे व्यापारी रायकुमार नहार यांनी सांगितले.

येथून होते तेलाची आवक

सूर्यफूल : रशिया, युक्रेन

सोयाबीन ः अर्जेंटिना, ब्राझील,

पामतेल : मलेशिया, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया

शेंगदाणा : आंध्रप्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक

घरगुती ग्राहकांकडून सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाला मागणी असते. बाजारात शेंगदाणा तेलाचे दर मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. शेंगदाणा तेलाचे उत्पादन राज्यातच होते.

- रायकुमार नहार, तेलाचे व्यापारी, मार्केट यार्ड

loading image
go to top