esakal | Corona Update : पुणे शहरात आजही नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

बोलून बातमी शोधा

Corona Update : पुणे शहरात आजही नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक
Corona Update : पुणे शहरात आजही नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक
sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पाच दिवसांत २ हजार १५२ ने कमी झाली आहे. त्याआधीचा आठवडाभर ही संख्या एक लाखांच्या आसपास स्थिर होती. त्यात आता ही संख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. पुणे शहरात शुक्रवारी (ता.२३) सलग पाचव्या दिवशी नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ९ हजार ८१० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील ४ हजार ४६५ जण आहेत.

हेही वाचा: बेड मिळेना म्हणून पुण्याच्या रुग्णाने रात्रीत गाठली सांगली

आज जिल्ह्यात १० हजार ३१० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील ५ हजार ६३४ जण आहेत.दिवसभरातील एकूण रुग्णांत शहरातील सर्वाधिक रुग्णाबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये २ हजार ४१७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २ हजार ३१७, नगरपालिका क्षेत्रात ४९० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील १ हजार ८३३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ९२३, नगरपालिका क्षेत्रातील ६३९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २८१ जण आहेत.

जिल्ह्यात आज १३७ मृत्यू

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२३) सर्वाधिक १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आजच्या एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ५८ मृत्यू आहेत. पिंपरी चिंचवडमधील ४३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २३, नगरपालिका हद्दीतील दहा आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.