पुण्यातील नगरसेवक दणकट; चंद्रकांत पाटलांची शाबासकी

Chandrakant-Patil
Chandrakant-Patil

कोरोनाकाळात पुण्यातील नगरसेवक उत्तमरीत्या काम करीत असल्याची शाबासकी देत, प्रत्येक प्रभागातील चार नगरसेवकांनी एकत्र येऊन लाखभर लोकांच्या तपासणीपासून किमान उपचार व्यवस्था उभारण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. सर्वच नगरसेवक दणकट आहेत. चौघेजण एक लाख लोकांची व्यवस्था करू शकतात, असा विश्‍वासही पाटील यांनी व्यक्त केला. कोरोनाचा उद्रेक, त्याचे परिणाम, उपचार व्यवस्था आणि यंत्रणांची क्षमता याबाबत ‘सकाळ’चे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत यांनी पाटील यांच्याशी साधलेला संवाद.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रश्‍न : हिंजवडीत स्वत:च्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी उभारलेले आयसोलेशन कितपत उपयुक्त ठरत आहे ? 
उत्तर : ज्या रुग्णांकडे पुरेसे घर नाही; त्यातही लक्षणे नसलेल्या आणि अन्य कोणतेही आजार नसलेल्यांसाठी हा कक्ष उभारला आहे. तेथे १०४ जणांची व्यवस्था आहे. राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय असल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना सामावून घेणे शक्‍य होते. गरज पडल्यास आणखी ५०० जणांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

गरजू रुग्णांसाठी ही संकल्पना मोठा आधार ठरत आहे. रुग्ण संख्या आणि अडचणी पाहता तुमच्या संकल्पनेची व्याप्ती वाढविणार आहात ?  
- निश्‍चितपणे, पुण्यातील वेगवेगळ्या भागांत कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आमदारांनी पुढाकार घेऊन मतदारसंघांमध्ये अशा स्वरूपात सुविधा पुरविल्यास नागरिकांना दिलासा मिळेल. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी तातडीने कार्यवाही केली पाहिजे. त्याबाबत मी स्वत: लक्ष घालून ही व्यवस्था उभारण्याबाबत भाग पाडेल. 

पुण्यातील कोरोनाविरोधातील मोहिमेत आणखी कोणाचा सहभाग हवा आणि त्यांनी काय करायला हवे, असे वाटते ? 
- नागरिकांना उपचार मिळत नाहीत, बेड मिळत नसल्याची ओरड कानावर येते आहे; तेव्हा शैक्षणिक संस्था काय करीत आहेत ? सामाजिक संघटना कुठे गेल्या ? त्या का पुढे येत नाहीत. आपल्याकडील जागा मोकळ्या करून त्या प्रशासनाकडे दिल्या पाहिजेत. कोविड केअर सेंटर आणि विलगीकरणासाठी आवश्‍यक ती सर्वच मदत केलीच पाहिजे. 

कोरोना रुग्णांसाठी आपले नवे नियोजन काय ? 
- पुण्यात उपचार घेणाऱ्या फारतर ८०-९० रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज आहे. उर्वरित रुग्णांना ऑक्‍सिजन बेड हव्यात आहेत. अशा रुग्णांची संख्या पाचशे-सहाशेच्या
 घरात; त्यामुळे पुढील काही दिवसांत मी १६० ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करतो आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

कोरोनाला रोखून रुग्णांना सामावून घेण्यात स्थानिक प्रशासन कुठे कमी पडत आहे ? 
- आता कोण कुठे आणि किती कमी पडतो आहे, यावर चर्चा करण्यापेक्षा रुग्णांना कमीतकमी वेळेत बेड दिलेच पाहिजे. रुग्णांना विलग करण्याची गरज आहे. त्यासाठी मंगल कार्यालये, हॉटेल, लॉज ताब्यात घेऊन तेथील सुविधांचा फायदा होईल. या कामात राजकीय नेत्यांनी भूमिका घेऊन पुढे आले पाहिजे. 

हॉस्पिटलकडून जादा बिल आकारल्याच्या तक्रारी वाढत आहेत. महापालिका आणि जिल्हा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते ? 
- मुळात प्रशासनाने आपल्या रुग्णालयांची क्षमता तर वाढविलीच पाहिजे. त्याशिवाय, काही छोटे हॉस्पिटल ताब्यात घेऊन संबंधित व्यवस्थापनाला भाडे द्यावे, ज्यातून रुग्णांना कमी पैशांत आणि वेळेत बेड उपलब्ध होतील. नगरसेवकांनीही आपल्या भागातील हॉस्पिटल मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. 

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार कोठे कमी पडत आहे?
- पुण्यात कोरोनाचा उद्रेक पाहाता पुणे महापालिका उत्तम काम करीत आहे. त्यासाठी पूरेशा प्रमाणात निधीही उपलब्ध केला आहे. मात्र, महापालिकांच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्यसरकारने सर्वच पातळ्यांवर सहकार्य करायला हवे. परंतू दुर्दैवाने तसे होत नाही. येेत्या काळात नागरिक सुरक्षित रहातील त्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.

आमच्यापर्यंत पोहोचवा कोरोना वॉरिअर्स
पुण्याच्या विविध भागांतील गरजूंच्या मदतीला लोकप्रतिनिधी रात्री-अपरात्री धावून गेले. त्यामुळेच अनेकांना उभारी मिळाली. आपल्या लोकप्रतिनिधींनी अशाच प्रकारे मदत केली असल्यास ‘सकाळ’ला आवर्जून कळवा.  
व्हॉट्‌सअप करा - 91300 88459
Email - editor@esakal.com

समन्वयक - ज्ञानेश सावंत

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com