
Pune Corporation : अखेर 'त्या' ठेकेदारांवर महापालिकेचा कारवाईचा बडगा
पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अखेर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ठेकेदारावर कारवाईचा बडगा उचलला आहे. योग्य पद्धतीने खड्डे न बुजविल्याने २५ हजार रुपयांचा दंड केला आहे. महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या लॉकडाऊनमध्ये मध्यवर्ती पेठांमध्ये सांडपाणी वाहिनी व जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू केले. लॉकडाऊन संपून बाजारपेठ पूर्वपदावर आली तरी या ठिकाणचे काम पूर्ण झालेले नाही. ज्या ठिकाणचे काम पूर्ण झाले तेथे काही ठिकाणी डांबरीकरण करून रस्ते बुजविले तर काही ठिकाणी सिमेंट काँक्रिट टाकले आहे.
शहरात समान पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, शनिवार पेठ, बुधवार पेठ यासह इतर भागात रस्ते खोदण्यात आले. याठिकाणी सिमेंट काँक्रिट टाकून रस्ते दुरुस्त केले. पण हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, चेंबर बर आले आहेत, त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महापालिका प्रशासन, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून टीका होत आहे. ‘सकाळ’नेही या खड्ड्यांची समस्या वारंवार मांडली.
यापार्श्वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा नुकताच पाहणी दौरा घडवून आणला. या भागातील रस्त्यांच्या कामाची पाहणी करताना खड्डे व्यवस्थित बुजविले नसल्याचे आयुक्तांना निदर्शनास आले. त्यांनी त्वरित रस्ते दुरुस्त करा असे आदेश पाणी पुरवठ्याचे काम करणाऱ्या ‘एल अँड टी’ कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले होते.
पेठांमधील रस्ते व्यवस्थित बुजविले नसल्याने ठेकेदारास २५ हजार रुपयांचा दंड केला आहे. ही रक्कम बिलातून वजा केली जाईल, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.