esakal | पुण्यात विविध केंद्रांवर डोस कमी, अन् गर्दीच जास्त
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

पुण्यात विविध केंद्रांवर डोस कमी, अन् गर्दीच जास्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना प्रतिबंधक लस (Corona preventive vaccine) कमी आणि गर्दीच जास्त.... असे चित्र महापालिकेच्या (Municipal) लसीकरण केंद्रांवर (Vaccination Center) गुरुवारीही पाहायला मिळाले. कमी डोस (Dose) उपलब्ध असल्याने महापालिकेने शहरातील मोजक्याच केंद्रांवर लसीकरण (Vaccination) होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे बंद असलेल्या केंद्रावरील नागरीकांनी दुसऱ्या केंद्रांवर धाव घेतल्याने गर्दी झाली होती. (Pune Covid Vaccine Center Dose Mob)

केंद्राकडून राज्याला आणि राज्याकडून महापालिकेला आवश्‍यक तेवढ्या लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरणातील गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरातील १९ हजार नागरिकांचे बुधवारी लसीकरण झाले. मात्र, राज्याकडून महापालिकेला कोणत्याही नवीन लसीचे डोस उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे शिल्लक राहिल्या डोसमधून गुरुवारी ७० केंद्रांवर लसीकरण केले. त्यासाठी महापालिकेने ७० टक्के दुसऱ्या डोससाठी, तर ३० टक्के पहिला डोस घेणाऱ्यांसाठी प्राधान्य निश्‍चित केले होते. त्यामुळे आज सकाळपासून केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.

बुधवारी डोस संपल्याने परत जावे लागलेले नागरिक आज पुन्हा केंद्रांवर आले होते. काही केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याचे बोर्ड लागले होते. त्यामुळे जवळपास कोणते केंद्र आहे, याची विचारपूस करून तेथे नागरिक जात होते. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठा भार आला होता. रांगेत थांबूनही नंबर येईपर्यंत लस संपल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काही केंद्रांवर तर सकाळी बारापूर्वीच लस संपल्याने ते बंद करण्याची वेळ आली. त्यामुळे आजही लसीकरण केंद्रांवरील गोंधळ दूर होऊ शकला नाही.

हेही वाचा: प्रवासादरम्यान गुंगीचा पेढा भरवून वरमाईला अडीच लाखांचा गंडा

दुसरा डोस घेण्याची मुदत ३ मे होती. दोन दिवसांपासून मी लसीकरण केंद्रावर येत आहे. परंतु, गर्दी आणि कमी लस उपलब्ध असल्यामुळे मला परत जावे लागत आहे. दुसऱ्या डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या महापालिकेला माहीत असूनही तेवढ्या लसींचा पुरवठा केंद्रांना का केला जात नाही. किती दिवस हेलपाटे मारावे लागणार आहे.

- सुधाकर देखणे, ज्येष्ठ नागरिक

लस घेण्यासाठी बुधवारी गेले होते. परंतु लस संपली होती. उद्या या, असे सांगण्यात आले. आज गेले, तर आजही लस नाही, असे सांगण्यात आले. दुसऱ्या केंद्रावर गेले, तर खूप गर्दी होती. कधी नंबर लागणार म्हणून आता परत घरी जाणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून हे असेच सुरू आहे.

- अलका तातुस्कर, ज्येष्ठ महिला

खासगी रुग्णालयात सुविधा देण्याची मागणी

पुणे शहरात कोविड लसीकरणाची सुविधा खासगी रुग्णालयात देखील उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महापालिकेचे माजी सभागृह नेते नीलेश निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

उत्पादक कंपन्यांकडून लशींची खरेदी करा

शहरात २० लाखांपेक्षा जास्त युवक आहेत. त्यांचे लसीकरण वेगाने करण्यासाठी उत्पादक कंपन्यांकडून लशींची खरेदी करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे शिवसेनेचे शहरउपप्रमुख किरण साळी यांनी केली आहे.

दुसरा डोस तातडीने उपलब्ध करून द्यावा

देशातील नागरिकांना कोरोनाची लस मोफत उपलब्ध करून द्यावी, तसेच लशीचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा