
Pune : गाडीचा आवाज का करतो असे विचारल्याने सराईत गुन्हेगाराचा पोलीसांवर हल्ला
किरकटवाडी : गाडीचा आवाज करुन उगीच गोंधळ का करतो असे विचारल्याने खुन, दरोडा, मारहाण करुन दहशत निर्माण करणे व इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व सध्या जामिनावर बाहेर असलेल्या सराईत गुन्हेगाराने सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील शिवनगर परिसरात अचानक थेट पोलीसांवरच हल्ला केला.
अगोदर समजावून सांगणाऱ्या हवेली पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या गुन्हेगाराला भर रस्त्यावर चांगलीच अद्दल घडवली. वैभव इक्कर (वय 22, रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे त्या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
खडकवासला- किरकटवाडी शिव रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे शिवजयंती निमित्त कार्यक्रम सुरू होता. हवेली पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विलास प्रधान आणि पोलीस नाईक राजेंद्र मुंढे हे त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होते. शांततेत कार्यक्रम सुरू असताना अचानक सराईत गुन्हेगार वैभव इक्कर हा शिवनगर गल्ली नंबर सहा मधून जोरात मोटारसायकल वाजवत आला.
मुख्य रस्त्यावर उभा राहून तो जोरजोरात रेस करु लागल्याने प्रधान आणि मुंढे या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने रस्त्यावरच गाडी टाकून दिली आणि, 'मला ओळखलं का, वैभव इक्कर नाव हे आपलं, त्या नम साहेबाला विचार वैभव इक्कर कसा हे. माझी गाडी आहे मी काही पण करणार... इथंच पेटवून देणार' असे म्हणत पोलीसांना शिवीगाळ करत गोंधळ घालू लागला.
पोलीस कर्मचारी प्रधान आणि मुंढे यांनी अगोदर त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तो अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत पोलीसांवरच हात उचलू लागला. संतापलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अखेर त्याची भर रस्त्यावर चांगलीच धुलाई केली. हा सर्व प्रकार अचानक घडल्याने काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याबाबत सराईत गुन्हेगार वैभव इक्कर याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
"पोलीस कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवून सराईत गुन्हेगाराला सामाजिक शांतता भंग करण्यापासून रोखले. त्या गुन्हेगाराने पोलीसांवर हल्ला केला त्यावेळी शेकडोंचा जमाव होता परंतु कोणीही पोलीसांच्या मदतीसाठी पुढे आले नाही.
शेवटी पोलीसही माणूसच असतो आणि कायद्याने मर्यादा असतात. दहशत निर्माण करणाऱ्या अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे." सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.