
Pune Crime : माजी महापौरांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन खंडणीची मागणी; दोघांना अटक
पुणे : माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मोबाईल क्रमांकाचा (स्पूफिंग कॉल) वापर करुन त्यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिक मित्राकडे तीन कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संदीप पीरगोंडा पाटील (वय ३३, रा. बेकनार, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) आणि शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी माजी महापौर मोहोळ यांच्या मोबाईल क्रमांकाचा बनावट वापर करुन त्यांच्याच बांधकाम व्यावसायिक मित्राकडून तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली. बांधकाम व्यावसायिक हे मोहोळ यांचे मित्र आहेत.
त्यांना खंडणीच्या फोनबाबत संशय आल्याने त्यांनी मोहोळ यांना हा प्रकार कळविला. मोहोळ यांनी ही बाब पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांना सांगितली. त्यानंतर मोहोळ आणि त्यांच्या मित्राने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
या संदर्भात पोलिस सहआयुक्त कर्णिक यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेने खंडणी मागणाऱ्यास पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार तक्रारदार यांनी फोनवरून १० लाख रूपये देण्याचे मान्य करून खंडणी मागणाऱ्यास कार्यालयात बोलावले.
परंतु खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने शेखर ताकवणे याला तक्रारदाराच्या कार्यालयात पाठविले. त्यावेळी पैसे घेताना युनिट तीनच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. मुख्य आरोपीने ताकवणे याला पैसे घेऊन स्वारगेट चौकात येण्यास मोबाईलवरून कळविले.
त्यानुसार पोलिस स्वारगेट चौकात पोचले. परंतु मुख्य आरोपी संदीप पाटील हा कात्रज चौक निसर्ग हॉटेल, सनसेट पॉइंट, जुना बोगदा असे वेळोवेळी फोन करून जागा बदलत होता. शेवटी पाटील याने ताकवणे याला कात्रज जुना बोगद्याजवळ पैसे घेऊन येण्यास सांगितले. द
रम्यान, मुख्य आरोपीला पोलिसांची चाहुल लागल्यामुळे तो कारमधून पळून जात होता. परंतु पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या पथकाने ही कारवाई केली.