Pune : वाढत्या कट्टासंस्कृतीने बारामतीकरांची चिंता वाढवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime Branch Squad

Pune : वाढत्या कट्टासंस्कृतीने बारामतीकरांची चिंता वाढवली

बारामती : शहरात काल झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर कट्टा संस्कृती बारामतीत वाढू लागली की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. बारामती पंचक्रोशीत गावठी कट्टे मुबलक असून त्यांचा शोध पोलिसांनी युध्दपातळीवर घ्यायला हवा, अन्यथा अनेकांना प्राणांना मुकावे लागेल, अशी नागरिक भीती व्यक्त करीत आहेत.

बारामती शहर, तालुका पोलिसांनी अनेकदा विविध कारवाया करत अनेकदा गावठी कट्टे व अत्याधुनिक पिस्तूलही जप्त केले आहेत. मध्यप्रदेशमधून गावठी कट्ट्यांचा पुरवठा होत असल्याचीही बाब मध्यंतरी एका प्रकरणात समोर आली होती. अगदी सहजतेने वीस पंचवीस हजारात कट्टा उपलब्ध होत असल्याने युवा पिढीत ही क्रेझ वाढू लागल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

कालच्या घटनेत किरकोळ कारणावरुन राग अनावर झाल्यानंतर थेट बंदूकीतून संबंधितावर गोळीबार करण्यात आला ही घटना गंभीर असल्याची बारामतीकरांची भावना आहे. दहशतीसाठी कट्ट्यांचा वापर करणे ही बाब युवकांमध्ये फोफावू लागल्याची भीतीही व्यक्त होत आहे.आपलेच वर्चस्व असावे या उद्देशाने पिस्तूल जवळ बाळगण्याची प्रवृत्ती बळावत चालली आहे. बारामती एमआयडीसी परिसरामध्ये अनेक कट्टे आजही असल्याची उघड चर्चा होते.

या बाबत ठोस पुरावा नसला तरी अनेकदा अशा गोळीबाराच्या घटनेच्या निमित्ताने ही बाब पुढे येते. पोलिस दलात पूर्वी असलेली गुन्हे शोध पथके बरखास्त केली गेली, गोपनीय पोलिसांच्या कामगिरीबद्दल चर्चा न केलेली बरी अशी स्थिती असताना आता नूतनपोलिस अधीक्षकांपुढेही अशी बेकायदा हत्यारे शोधून काढण्याचे आव्हान समोर असेल. कार्यक्षम पोलिस अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश असलेली विशेष गुन्हे शोध पथके पुन्हा स्थापन करुन चोरी, दरोडा, हत्यारांचा वापर, गुन्हेगारांचा शोध अशा प्रकरणात त्यांची मदत घेण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे.

गुप्त माहिती मिळवून अशा पध्दतीने कारवाई केली तरच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी बारामतीकरांची भावना आहे.