
Pune Crime News : शरीरसंबंध ठेवण्यास सक्षम नसल्याची बाब लपविली; पतीविरुद्ध गुन्हा
पुणे : शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नसल्याची बाब लपवून पतीने विवाह करून फसवणूक केल्याची तक्रार एका उच्चशिक्षित ३० वर्षीय महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात केली. याप्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही बी.टेक. आणि एम.बी.ए. अशी उच्चशिक्षित आहे. ती एका कंपनीत नोकरीस आहे. तिचा पती अभियंता असून, तोही एका कंपनीत नोकरीस आहे. या दोघांचा विवाह एप्रिल २०२२ मध्ये झाला. त्यानंतर ते मधुचंद्रासाठी मालदीव येथे गेले होते. पण त्यांच्यामध्ये पती-पत्नीप्रमाणे संबंध आले नाहीत. त्यानंतरही पतीकडून टाळाटाळ सुरू होती.
या प्रकरणाची कोठेही वाच्यता करू नये, यासाठी पती आणि सासू-सासऱ्याने तिला शिवीगाळ आणि मारहाण केली. याबाबत विवाहितेने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक केलेली नाही.