
Crime News : उसणे दिलेले पैसे मागितल्यामुळे दोन मित्रांनी केला मित्राचा दृश्यम स्टाईलने खून
भोर : उसणे घेतलेले पैसे परत मागण्याचा तगादा लावल्यामुळे आपल्याच मित्राचा खून केल्याप्रकरणी भोर पोलिसांनी दोघांना अटक केली. अक्षय सुनिल होळकर (वय ३०, रा. शनीनगर, आंबेगाव ब्रु,पुणे) व समीर मेहबूब शेख (वय ४३, मिलींदनगर पिंपरी पुणे) असे अटक केलेल्या तरुणांची नावे असून त्यांनी दत्तात्रेय शिवराम पिलाणे (वय-३२ वर्षे, रा. शनीनगर आंबेगाव ब्रु,पुणे, मूळ रा-महुडे ता.भोर) याचा डोक्यात हातोडा मारून व गळ्यावर चाकूने वार करून खून केला.
भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील व पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी याबाबत माहिती दिली. १७ मार्चला भोर-महाड मार्गावरील वारवंड गावच्या हद्दीत झाडात अडकलेला मृतदेह पोलिसांना मिळाला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे आणि अंगावर कपडे नसल्यामुळे त्याची ओळख पटविणे अवघड झाले होते.
पोलिसांनी पुणे व सातारा जिल्ह्यातील आणि पुणे शहरातील मिसींग (हरविलेल्या) व्यक्तींची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यावेळी सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दत्तात्रेय शिवराम पिलाणे हा मिसींग असल्याचे समजले.

हरविल्याची खबर देताना दत्तात्रेयच्या वडिलांनी सांगितले होते की, अक्षय होळकर याने १० मार्चला सायंकाळी पाचच्या सुमारास बोलावून घेतले होते. त्यामुळे भोर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अक्षयच्या आणि त्याच्या मित्राच्या हालचालींवर लक्ष ठेवले.
आणि तांत्रिक पध्दतीने त्यांच्या हालचालीचे निरीक्षण केले. अक्षयच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी अक्षय होळकर व समीर शेख यांना सोमवारी (ता.२७) पहाटे ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी दत्तात्रेय पिलाणे याचा खून केल्याचे कबूल केले. मयत दत्तात्रेय याच्याकडून अक्षय होळकर यांने पाच-सहा लाख रुपये उसणे घेतले होते. आता दत्तात्रेयने पैसे परत मागण्याचा तगादा लावला होता.
म्हणून अक्षयने १० मार्चला सायंकाळी दत्तात्रेय यास बोलवून घेतले. त्यास इको मोटारीतून बसवून समीर शेख यांच्या मदतीने त्याच्या डोक्यावर हातोडीने घाव घालून आणि गळ्यावर चाकूने वार करून खून केला. त्याच्या अंगावरील कपडे जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा मृतदेह वरंधा घाटातील वारवंड गावच्या हद्दीतील दरीत फेकून दिला.
१७ मार्चला पोलिसांना मृतदेह आढळून आला. आणि पोलिसांनी दहाच दिवसात २७ मार्चला कुठल्याही पुराव्याशिवाय व माहितीशिवाय खून झालेल्या व्यक्तीचे नाव आणि खून करणा-या आरोपींना अटक केली. पोलिसांच्या पथकात
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भोरचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, हवालदार विकास लगस, उध्दव गायकवाड, अविनाश निगडे, यशवंत शिंदे, निलेश सटाले, दत्तात्रेय खेंगरे, शौकत शेख, वर्षा भोसले, प्रियांका जगताप, सचिन घाडगे, अजित भुजबळ, अमोल शेडगे, राज मोमीन, बाळासाहेब खडके आदींचा समावेश होता. पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे पुढील तपास करीत आहेत.