गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला दोन कोटींचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fraud case

गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एका खासगी कंपनीने महिलेची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

Pune Fraud : गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला दोन कोटींचा गंडा

पुणे - गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एका खासगी कंपनीने महिलेची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक करून त्या वित्तीय संस्थेचे संचालक दुबईत पसार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांकडून दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फसवणूक झालेल्या महिलेने याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रांत रमेश पाटील (वय २५, रा. मोराळे, पलूस, जि. सांगली) आणि संतोषकुमार विष्णू गायकवाड (रा. बलवडी, ता. खानापूर, जि. सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला एनडीए रस्त्यावरील शिवणे परिसरात राहायला आहे. तिच्या पतीचा व्यवसाय आहे. आरोपी गायकवाड याची फिर्यादी यांच्याशी ओळख आहे.

आरोपी पाटील आणि गायकवाड यांनी प्रभात रस्त्यावर कार्यालय सुरु करून फिर्यादी यांना आभासी चलन, कंपनीतील समभागात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार महिलेने सुरवातीला आरोपींकडे एक कोटी रुपये गुंतविण्यास दिले. त्यानंतर महिलेकडून दोघांनी पुन्हा ८० लाख रुपये घेतले. गेल्या वर्षी मार्च महिन्यात आणखी एक योजना सुरु होणार असून या योजनेत गुंतवणूक करा, असे आरोपींनी महिलेला सांगितले होते.

आणखी २० लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला दोन कोटी रुपयांच्या रकमेवर ५० लाख रुपये नफा मिळेल. मूळ मुद्दल आणि नफ्यासह अडीच कोटी रुपये मिळतील, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार महिलेने आरोपींना पुन्हा २० लाख रुपये दिले. पैसे परत मिळण्यासाठी महिलेच्या पतीने दोघांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांचे मोबाईल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. दोघे आरोपी दुबईला गेले असून त्याचे कार्यालय बंद केल्याचे समजल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर या गुन्‍ह्याचा तपास करीत आहेत.