esakal | Pune : कोरोनामुक्तीनंतर केस गळण्याचे संकट
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : कोरोनामुक्तीनंतर केस गळण्याचे संकट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आधी कोरोनाचा संसर्ग, त्यानंतर आलेला भीषण अशक्तपणा यातून महिन्याभरात आता कुठे सावरत होतो तर मोठ्या प्रमाणात केस गळणे सुरू झाले. आता कोरोनानंतरच्या औषधांबरोबरच केस गळती थांबण्याची औषधे घ्यावी लागत आहेत... वयाच्या पस्तीशीतील केदार वाळुंजीकर बोलत होते.

आमच्या घरात एकावेळी तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून आम्ही सगळे बरे झालो. पण, जवळपास दहा-पंधरा दिवस प्रचंड अशक्तपणा होता. घराच्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्याचे त्राणही नव्हते. त्यातून महिन्याभरानंतर आता कुठे बरे वाटतं आहे. अशातच कोरोनानंतर केस गळण्याचं दुसरं संकट उभं राहिलं. त्यातून बाहेर पडण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं सुरू केली आहेत... असेही वाळुंजीकर यांनी स्पष्ट केले.

कोरोनातून बऱ्या झालेल्या माधुरी करंदीकर यांनाही केस गळत असल्याचा अनुभव येत आहे. त्या म्हणाल्या, ‘‘सिझेरियन डिलिव्हरीनंतर मोठ्या प्रमाणात केस गळल्याचा माझा अनुभव होता. पण, कोरोनानंतर केस गळत असल्याचे आतापर्यंत ऐकिवात नव्हते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग झालेल्या ओळखीच्या रुग्णांशी संपर्क साधला, पण त्यांच्यामध्ये केस गळण्याचा प्रकार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे काळजी अजून वाढली. पण, त्वचारोगतज्ज्ञांशी संपर्क साधल्याने मोठा दिलासा मिळाला. कोरोनानंतर विशेषतः दुसऱ्या लाटेमध्ये केस गळती होत असल्याचे निरीक्षणही तज्ज्ञांनी नोंदविले.’’

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये केस गळण्याचे प्रकार वाढले आहे. बरे झाल्यानंतर सुमारे तीन महिने केस गळतात. कोरोनाच्या उपचारात दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे केस गळतात. यापूर्वी काविळ, डेंगी, चिकुनगुण्या अशा आजारांनंतर केस गळत असायचे. त्याच प्रकारे कोरोनामध्येही होत आहे. पण, कोरोनानंतर केस गळण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. कोरोनानंतरची केसगळती थांबविण्यासाठी प्रथिनयुक्त आहार घ्या.

- डॉ. धनश्री भिडे, त्वचारोग तज्ज्ञ

loading image
go to top