esakal | Video : पुणेकर संकटात, हॉस्पिटलमध्ये जागाच नाही, तर उपचार घ्यायचे कुठे?
sakal

बोलून बातमी शोधा

Hospital-bed

रुग्णांवर तिष्ठत उभे राहण्याची वेळ
शहरात बुधवारी रात्री १२ ते १५ कोरोनाबाधीत रुग्ण बेड मिळण्याची वाट पहात एका मोठ्या हॉस्पिटलच्या दारात अक्षरशः रांगेत उभे होते. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात बेड उपलब्ध नाहीतच, पण ऑक्‍सिजनची व्यवस्था असलेल्या बेडही आता मिळत नाहीत. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये फोन करून विचारल्यानंतर ‘बेड नाही’ हे एकच उत्तर रुग्णाच्या नातेवाइकांना मिळत आहे, असे निरीक्षण एका ज्येष्ठ डॉक्‍टरांनी नोंदविले.

Video : पुणेकर संकटात, हॉस्पिटलमध्ये जागाच नाही, तर उपचार घ्यायचे कुठे?

sakal_logo
By
योगीराज प्रभुणे

पुणे - कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना एकेका बेडसाठी हॉस्पिटलच्या दारात तासन्‌तास बसावे लागत आहे. पण, त्यानंतरही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी जागा मिळत नाही. कोरोनाची स्पष्ट लक्षणे दिसत असणाऱ्या रुग्णांनी उपचार घ्यायचा तरी कुठे?, असा सवाल आता पुणेकर महापालिका प्रशासनाला विचारत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात कोरोनाबाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही वयोवृद्ध, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा अशा इतर व्याधी असणाऱ्या रुग्णांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. यापैकी कोरोनाची स्पष्ट लक्षणे दिसणाऱ्यांना उपचारांसाठी दाखल करण्याचा सल्ला डॉक्‍टर देतात. मात्र, यातील बहुतांश रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याने दाखल करून घेता येत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.

धावाधाव अन शोधाशोध
कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे निदान झाल्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नातेवाइकांना धावाधाव करावी लागत आहे. पण, त्यानंतरही हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याचे पुणेकरांची चिंता वाढली आहे. त्यामुळे एकेका बेडसाठी रुग्णाचे नातेवाईक शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी धावाधाव करत आहेत. शक्‍य त्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बेड शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

राज्यात बारावीचा निकाल ९०.६६ टक्के लागला 

नेमकं काय झालंय ?

  • हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन आणि नॉन ऑपरेशन बेडस्‌ अशी वर्गवारी केली आहे. डायलिसिस, कॅन्सर, डे-केअर, लहान मुलांसाठी, प्रसूती या नॉन ऑपरेशनल बेडस्‌ आहेत. या वगळून हॉस्पिटलमध्ये शिल्लक राहिलेल्या ऑपरेशनल बेडस्‌ प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत.
  • ५०० बेडस्‌ असलेल्या एखाद्या रुग्णालयामधून फक्त १५० बेडस्‌ ऑपरेशनसाठी दाखविल्या आहेत. त्यामुळे हॉस्पिटलने जाहीर केलेल्या ऑपरेशनल बेडस्‌पैकी ८० टक्के प्रशासनाने घेतल्या आहेत. 
  • अधिग्रहण केलेल्या ८० टक्के बेडस्‌ फक्त कोरोनाबाधीत रुग्णांसाठी नाहीत. त्या इतर रुग्णांच्या उपचारांसाठी खुल्या आहेत. त्याची फी नियंत्रित केली आहे.   
  • अधिग्रहण केलेल्यापैकी ८० टक्के बेडस्‌ कोरोनाबाधीतांसाठीच वापरायच्या अशी सक्ती हॉस्पिटलवर नाही. त्यामुळे इतर आजाराच्या रुग्णांसाठी वापरण्याचा निर्णय हॉस्पिटलने घ्यायचा आहे. त्या आधारावर अधिग्रहण केलेल्या सर्व बेडस्‌ काही रुग्णालये इतर रुग्णांच्या उपचारांसाठी वापरत आहेत.

हॉस्पिटलपुढील समस्या

  • हॉस्पिटलमध्ये बेडस्‌ उपलब्ध आहेत. पण, रुग्णांना दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्‍टर नाहीत. 
  • कोरोना उद्रेकात बहुसंख्य डॉक्‍टर हॉस्पिटल सोडून गेले आहेत. त्यामुळे रुग्णालयांकडे निम्मेच मनुष्यबळ शिल्लक राहिले. 
  • कोरोनाच्या भीती डॉक्‍टरांमध्येही दिसते. त्यामुळे हॉस्पिटलमधून काही डॉक्‍टरांनी राजीनामे दिले आहेत. 

Edited By - Prashant Patil

loading image