
रिक्षा संघटनांच्या आंदोलनात सहभागी न होता रिक्षातून प्रवाशी वाहतूक केल्याच्या रागातून अज्ञात व्यक्तींनी एका चालकाची रिक्षा फोडून त्याचे नुकसान केले.
Rickshaw Damage : आंदोलनात सहभागी न झाल्याने रिक्षाची तोडफोड; आठजणांविरूद्ध गुन्हा दाखल
पुणे - रिक्षा संघटनांच्या आंदोलनात सहभागी न होता रिक्षातून प्रवाशी वाहतूक केल्याच्या रागातून अज्ञात व्यक्तींनी एका चालकाची रिक्षा फोडून त्याचे नुकसान केले. याप्रकरणी नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याने रिक्षाची तोडफोड झाल्याचे उघडकीस आल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 12 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता आंबेगाव बुद्रूक परिसरात घडली आहे.
केशव नाना क्षीरसागर, संजीव कवडे, आनंद अंकुश, तुषार पवार, बाबा सय्यद यांच्यासह इतर चारजणांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय चंद्रकांत शिर्के (वय 46 , रा. कसबा पेठ ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध रिक्षा संघटनांकडून दुचाकी कॅबच्या निषेधार्थ 12 डिसेंबर रोजी आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. संशयित आरोपींनी संबंधित आंदोलनात चिथावणीखोर वक्तव्य केले होते.
दरम्यान, आंदोलनात सहभागी न होता, उदय शिर्के हे त्यांच्या रिक्षातून प्रवाशांची वाहतूक करीत होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी आंबेगाव परिसरात फिर्यादीची रिक्षा अडवून रिक्षाची तोडफोड केली. त्यांना दमदाटी करीत त्यांच्याकडील 500 रूपये हिसकावून नेले. या घटनेमुळे रिक्षातील प्रवासी घाबरुन तेथून पळून गेले. चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या कारणावरुन संबंधित घटना घडल्याचे पोलिसांना निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, रिक्षाची तोडफोड करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.