![कोरोना लस](http://media.assettype.com/esakal%2F2021-04%2Fbe2b6613-6aa2-44f2-9a1d-916d3db65182%2Fcovid_vaccine.jpeg?rect=0%2C0%2C960%2C540&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे: देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण पुण्यात असल्याने पुण्यासाठी केंद्र सरकारने विशेष लससाठा उपलब्ध करून द्यावा. यासाठी महापालिकेतील महापौरांसह इतर पदाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला. भाजपच्या नेत्यांकडे याबाबत विनंतीही केली. महापौर व आयुक्तांना सोबत घेऊन सिरम कंपनीला भेट देऊन लस मिळेल का याची चाचपणी केली. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून केंद्र सरकारकडून मागणीची दखलच घेतली नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
पुणे शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांचा दर ४० टक्क्याच्या पुढे गेल्याने देशात सर्वाधिक गंभीर स्थिती निर्माण झाली होती. याच अतिशय संथ गतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण असल्याने व सिरम कंपनीही पुण्यात असल्याने थेट कंपनीकडून लस मिळण्याची परवानगी द्यावी असा मतप्रवाह समोर आला.
पुण्यासाठी अतिरिक्त डोस उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे पत्र तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाठवले होते. तसेच महापौर व आयुक्त विक्रम कुमार यांनी सिरम कंपनीला भेट दिली होती. त्यावेळी केंद्र सरकारने मान्यता दिल्यास आम्ही लस उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते.
केंद्र सरकारने मे महिन्यात राज्य सरकार व खासगी रुग्णालयांना थेट कंपन्यांकडून लस खरेदीसाठी मान्यता दिली. महापालिकाही लस खरेदी करू शकणार असल्याने मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकेनेही जागतिक निविदा काढण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण लसीकरण गोंधळ होत असल्याने केंद्र सरकारने पुन्हा सर्व अधिकार स्वतःकडे घेतले.
सध्या केंद्र सरकार व खासगी रुग्णालयेच थेट कंपन्यांकडून लस खरेदी करत आहेत. पुणे शहरासाठी ६८ लाख डोसची आवश्यकता असून, आत्तापर्तंय २८ लाख डोस देण्यात आले आहेत. आठवड्यातील तीन-चार दिवस लसीकरण बंद राहात आहे.
शहरातील केवळ २३ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस झाले आहेत. २० लाख जणांचा एक डोस झाला आहे. तर अजूनही ६ लाख नागरिकांचा एकही डोस झालेला नाही. ४० लाख डोसची गरज असली तरी केंद्र सरकारकडून लस कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. महापालिकेने केलेल्या मागणीची दखलही घेतलेली नाही.
‘‘केंद्र सरकारकडून पुणे शहरासाठी जादा डोस मिळावेत यासाठी पत्रव्यवहार केला होता. सिरम कंपनीला भेट देखील दिली होती. शहरात आत्तापर्यंत २८ लाख लसीकरण झाले आहे. शहरासाठी अजूनही जास्त लस मिळावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे.’’ - मुरलीधर मोहोळ, महापौर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.