Pune : भैय्या मेरे, राखीके बंधन को निभाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News

Pune : भैय्या मेरे, राखीके बंधन को निभाना

धायरी :  हजारो मैलांचे अंतर पार करून राखीच्या रुपात दूरच्या दुर्गम प्रदेशात एक प्रेमाचा, मायेचा धागा पोहोचतो, आणि दोन अनामिक व्यक्तींमध्ये निर्माण होते अतूट नाते. ज्याला राखी पाठवली गेली तो भाऊ कोणत्याही परिस्थितीत आपल्या अनोळखी बहिणीला भेटायचेच असा निश्चय करतो आणि तब्बल ८ वर्षांनी भाऊ, बहिणीची भेट नियती घडवून आणते.

कारगिल सीमेवर तैनात असलेल्या माधव मोरे यांना धायरीच्या एका शाळेतून जवानांना पत्र पाठवण्याच्या उपक्रमाअंतर्गत २०१४ साली राखी व पत्र पाठवण्यात आले होते. तेव्हापासून मोरे यांना आपल्या या अनोळखी बहिणीच्या भेटीची ओढ लागली होती. मात्र, विविध ठिकाणी झालेल्या पोस्टिंगमुळे ही भेट शक्य होत नव्हती.

राखीसोबत असलेल्या शुभेच्छा पत्रावरील शाळेचा पत्ता आणि २०१४ पासून जपून ठेवलेले पत्र एवढाच मार्ग मोरे यांच्या हाती होता. काही महिन्यांपूर्वी योगायोगाने त्यांची नियुक्ती पुण्यातील औंध २४ मराठा बटालियन येथे झाली. शाळेच्या नावाची चौकशी करत एका व्यक्तीकडून त्यांनी संस्थाचालक काकासाहेब चव्हाण यांच्याशी संपर्क केला. कधीच न भेटलेल्या या बहिणीची भेट घेत ही आगळी भाऊबीज खास ठरवली. सांचल खेडेकर असे या मानलेल्या बहिणीचे नाव आहे. ती कॉम्प्युटर इंजिनिअर असून, ती खासगी कंपनीत आहे.

धायरी येथील कै. बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक विद्यालयाच्या सांचल खेडेकर या विद्यार्थिनीने २०१४ मध्ये शाळेतील एका उपक्रमांतर्गत पाठवलेली राखी मोरे यांच्या मनगटावर बांधली गेली, तेव्हापासून मोरे यांना या बहिणीला भेटण्याची ओढ लागली.

जवान माधव मोरे यांच्या घरी एकदा रिक्षामधून पाहुणे आले असताना त्यांनी सहज रिक्षा चालकाला विचारले की, तुम्ही कुठून आलात? राजू चव्हाण नावाच्या त्या रिक्षाच्या चालकाने धायरीतून आल्याचे सांगितले. मोरे यांना लगेच त्या विद्यार्थिनीने पाठविलेल्या पत्राची अन् राखीची आठवण झाली. त्यांनी त्या शाळेच्या मुख्याध्यापक किंवा मुख्य व्यक्तीचा मला नंबर द्याल का? असे विचारणा करताच त्यांनी संस्थाचालक काकासाहेब चव्हाण यांचा मोबाइल नंबर मोरे यांना दिला. त्यानंतर भेटीचा योग घडून आला.

मी शेतकरी कुटुंबातून आहे. त्यामुळे लहानपणापासून कष्ट करण्याची सवय आहे आणि सैन्यामध्ये जाण्यासाठी खडतर कष्ट प्रशिक्षण घरच्यांपासून दूर आणि देशासाठी काम करावे लागते. मला भाऊ नाही; परंतु माझा भाऊ एवढेच कष्ट करून सैन्यात गेला असता तशी मी कल्पना करून हे पत्र लिहिलं होतं. मला आज सांगायला अभिमान वाटतो की मला माझा भाऊ मिळाला.

-सांचल खेडेकर, धायरी

कारगिल येथील सीमेवर असताना आपल्या कुटुंबापासून दूर सीमेवर असलेल्या आम्हा जवानांना या राखीचे अप्रूप असते. माझ्या आयुष्यामधील हे पत्र आणि राखी रुपाने सर्वात मोठा अनमोल ठेवा, मला माझ्या बहिणीने दिला आहे.

- माधव मोरे, जवान (२४ मराठा बटालियन)

आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी प्रेमाचे प्रतीक असलेली राखी व पत्र जवानांना पाठवितात. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सैनिकांबद्दल प्रेम, आपुलकी निर्माण व्हावी, या भावनेतून हा उपक्रम दरवर्षी घेण्यात येतो.

- काकासाहेब चव्हाण, संस्थाचालक (चव्हाण माध्यमिक विद्यालय)