RCMS : पुणे जिल्हातील ३६.५४ टक्के लाभार्थ्यांनी शिधापत्रिकेला भ्रमणध्वनी क्रमांक जोडणी केली pune district 13 tahsil 36.54 percentage Beneficiary attached mobile number to ration card | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ration Card

RCMS : पुणे जिल्हातील ३६.५४ टक्के लाभार्थ्यांनी शिधापत्रिकेला भ्रमणध्वनी क्रमांक जोडणी केली

पुणे - शिधापत्रिकेच्या व्यवस्थापन प्रणालीमध्ये (आरसीएमएस) लाभार्थ्यांना आधार क्रमांकाबरोबरच भ्रमणध्वनी क्रमांक जोडणी अनिवार्य केले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. १३ तालुक्यातील अवघ्या ३६.५४ टक्के लाभार्थ्यांनी शिधापत्रिकेला भ्रमणध्वनी क्रमांक जोडणी केली आहे.

केंद्र सरकारच्या घोषणेनुसार ‘वन नेशन वन कार्ड’ म्हणून शिधापत्रिकेला मान्यता दिली आहे. त्यानुसार शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट असलेल्या कुटुंबातील सदस्यांना सहज शिधा उपलब्ध व्हावा, तसेच देशातील कुठल्याही भागात धान्य मिळणे सोईचे व्हावे, यासाठी आधारकार्डला जो भ्रमणध्वनी क्रमांक लिंक केला आहे, तोच क्रमांक शिधापत्रिकेला जोडण्याबाबत आदेश दिले आहेत. जेणेकरून एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे हातांचे ठसे किंवा शिधापत्रिकेवरील व्यक्तींपैकी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती वितरण केंद्रांवर गेल्यावर मोबाईलवर संदेश प्राप्त होऊन ओटीपीद्वारे स्वस्त धान्य विक्री केंद्रावरील सेवांचा लाभ घेता येईल.

जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये २४ लाख ९१ हजार ५४६ लाभार्थीं असून आत्तापर्यंत केवळ ९१ हजार ३४२ लाभार्थ्यांनी शिधापत्रिकेला भ्रमणध्वनी क्रमांक जोडला आहे. बारामती तालुक्यात सर्वाधिक तीन लाख २५ हजार ४३८ लाभार्थ्यांची संख्या असून जवळपास ५०.७७ टक्के लाभार्थ्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक जोडणी केली आहे, तर सर्वाधिक कमी लाभार्थी संख्या ३३ हजार ९१ वेल्हे तालुक्यात असताना तालुक्यातील ४५.४५ टक्के लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात भ्रणध्वनी क्रमांक जोडणी केल्याची माहिती माने यांनी दिली. इतर तालुक्यातही पूर्णपणे भ्रमणध्वनी जोडणी झाली नाही.

यापूर्वी शिधापत्रिकेला भ्रमणध्वनी क्रमांक जोडण्यासाठी तालुका पुरवठा कार्यालयात जाऊन प्रणालीद्वारे क्रमांक जोडण्यात येत होते. परंतु, ही सुविधा आता स्वस्त धान्य विक्री केंद्रांवरील ई-पॉस यंत्रांवर देखील उपलब्ध करून दिली आहे, तरी ज्या लाभार्थ्यांना भ्रमणध्वनीवर संदेश येत नाही, त्यांनी त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक रास्त भाव विक्री केंद्रांवर किंवा तहसिल कार्यालयात जाऊन जोडावा.

- सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी

‘ओटीपी’ पाठवून घेता येणार धान्याचा लाभ

राज्य शासनाकडून गरीब, गरजूंना स्वस्त धान्य विक्री केंद्रांवर अल्प दरात धान्याचे वितरण केले जाते. शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक जोडणी केली असली, तरी शिधापत्रिकेमध्ये कुटुंबातील व्यक्तींची नावे असतात. त्यापैकी मोजक्याच लाभार्थ्यांची बोटांची ठसे घेतलेली असतात, इतर प्रमुखांना केंद्रावर गेल्यावर धान्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे भ्रमणध्वनी क्रमांक जोडल्यानंतर त्यावर येणाऱ्या ओटीपी क्रमांकावरून धान्याचा लाभ घेता येणार आहे.