
पुणे जिल्ह्यातील साडेचारशे ग्राम पंचायती कोरोनामुक्त; भोर तालुक्याची आघाडी
पुणे- पुणे जिल्ह्यातील २१५ ग्रामपंचायती आज अखेरपर्यंत (ता.१४)कोरोनामुक्त झाल्या आहेत. शिवाय अन्य २२९ ग्रामपंचायतींनी गेल्यावर्षभरापासून (कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत) कोरोनाला वेशीवरच रोखून धरलेले आहे. या ग्रामपंचायतींनी मागील १३ महिन्यापासून कोरोनाला आपापल्या गावात एंट्रीच करू दिलेली नाही. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या आणि अद्याप गावात एंट्री न मिळू दिलेल्या ग्रामपंचायतींची संख्या ४४४ झाली आहे. गावे कोरोनामुक्त ठेवण्यात भोर तालुक्याने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. शहराप्रमाणेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. फक्त जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ६२० झाली आहे. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत १ लाख २३ हजार ४९३ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. सध्या १९ हजार ७११ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. अन्य दोन हजार ४१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा: पुणे जिल्ह्यात एक लाख सक्रिय कोरोना रुग्ण; दिवसभरात ९९ रुग्णांचा मृत्यू
ग्रामीण भागातील सर्वाधिक २ हजार ९२७ सक्रिय कोरोना रुग्ण हे हवेली तालुक्यात आहेत. कोरोनाने सर्वाधिक मृत्यूसुद्धा हवेली तालुक्यातच झाले आहेत. सद्यःस्थितीत सर्वांत कमी म्हणजे केवळ ७४ कोरोना रुग्ण वेल्हे तालुक्यात आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेत वेल्हे तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. राज्यातील पहिला रुग्ण ९ मार्चला पुणे शहरात सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १० मार्च २०२० ला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिला कोरोना रुग्ण हा हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रूक येथे सापडला होता. ग्रामीण भागातील पहिल्या दहा रुग्णांमध्ये वेल्हे तालुक्यातील सहा रुग्ण होते. सध्या जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी दहापेक्षा अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
कोरोनामुक्त ग्रामपंचायतींची संख्या- आंबेगाव - १९, बारामती -१६, भोर -१०१, दौंड -१२, हवेली -२२, इंदापूर -२७, जुन्नर-११, खेड व मावळ प्रत्येकी - ६२, मुळशी -२४, पुरंदर -२२, शिरूर -१० आणि वेल्हे - ५६.
Web Title: Pune District Corona News Villages Covid Free Bhor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..