

Teacher Senior and Selection Pay Scale Training
esakal
इंदापूर: पुणे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालयांतील शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाला येत्या 13 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. 13 ते 22 नोव्हेंबर 2026 या कालावधीत सलग दहा दिवस हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, 22 नोव्हेंबर रोजी प्रशिक्षणार्थी शिक्षकांचे मूल्यमापन होणार आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 137 शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात एकूण 15 प्रशिक्षण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) पुणे यांच्या कार्यक्षेत्रातील पुणे ग्रामीण, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच खडकी, देहूरोड व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील शिक्षकांना सोयीचे व्हावे, या दृष्टीने प्रशिक्षण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांवर शिक्षक हस्तपुस्तिकाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य तथा उपसंचालक नामदेव शेंडकर यांनी दिली.