
Pune: कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने पुणे शहराला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे पुणेकरांचा आनंद द्विगुणित झाला आहे. यानिमित्ताने भाजपने आगामी महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली असल्याचेच दिसत आहे. दरम्यान, यापूर्वी १९९५ मध्ये राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पुण्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली होती.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मंत्रिपदाच्या वाटपावरून राज्यात सुरू असलेला घोळ अखेर मिटला. मंत्रिमंडळात पुण्याला स्थान मिळणार का? कोणाची वर्णी लागणार? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सात जागांवर महायुतीला यश मिळाल्याने मंत्रिपदासाठी चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच माधुरी मिसाळ, सुनील कांबळे आणि सिद्धार्थ शिरोळे यांची नावे चर्चेत होती. अखेर पाटील आणि मिसाळ यांच्या नावांवर पक्षाने शिक्कामोर्तब केला आहे.