

पुणे, ता. ३१ : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या (एमएमसी) हुबेहूब दिसणाऱ्या बनावट संकेतस्थळाद्वारे डॉक्टरांची नोंदणी आणि वैयक्तिक माहिती लांबवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा सायबर भामट्यांचा मोठा कट उघडकीस आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व ॲलोपॅथी डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली असून, सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
‘एमएमसी’ ही राज्यातील एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी त्याचबरोबर एम.डी., एम.एस. अशा पदव्युत्तर पदव्या व डी.एम., एम.सी.एच. यांसारख्या सुपर-स्पेशालिटी वैद्यकीय पदव्या असलेल्या डॉक्टरांची नोंदणी करणारी परिषद आहे. राज्यात सध्या दोन लाख १५ हजारांहून अधिक डॉक्टर या परिषदेत नोंदणीकृत आहेत. त्यापैकी ९० हजारांच्या आसपास पदव्युत्तर पदवी असलेले आहेत. परिषदेचे www.maharashtramedicalcouncil.org.in हे अधिकृत संकेतस्थळ असताना त्यामध्ये थोडा बदल करून नवीन संकेतस्थळ तयार केल्याने पुण्यातील नोंदणीकृत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यातून फसवणूक होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ‘एमएमसी’ने डॉक्टरांना सावध राहण्याचे आवाहन केले.
‘एमएमसी’ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत निवेदनही प्रसिद्ध केले. त्यात बनावट आणि अधिकृत वेबसाइटमधील फरक स्पष्ट केला आहे. बनावट वेबसाइटवरही नोंदणी, लॉगिन आणि इतर सेवा उपलब्ध असल्याचे भासविण्यात आले. मात्र, या वेबसाइटचा ‘एमएमसी’शी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. बनावट वेबसाइटवर डॉक्टरांनी वैयक्तिक माहिती देऊ नये, कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत आणि ‘एमएमसी’च्या अधिकृत सेवांसाठी या पोर्टलचा वापर करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.
अधिकृत वेबसाइट तपासणे महत्त्वाचे
‘एमएमसी’च्या नोंदणी व नूतनीकरणासह सीपीडी, सीएमई सेवा, ओळखपत्र, केवायडी क्यूआर आणि अधिकृत सूचना यांसाठी केवळ अधिकृत वेबसाइटच वापरण्याचे आवाहन केले आहे. बनावट वेबसाइटवर वैयक्तिक माहिती देऊ नये, तसेच कोणताही व्यवहार करू नये. अधिकृत सेवांसाठी केवळ ‘एमएमसी’च्या अधिकृत वेबसाइटचाच वापर करावा, असा सावधानतेचा इशारा ‘एमएमसी’ने दिला.
हे बनावट संकेतस्थळ दोन महिन्यांपूर्वीच तयार केल्याचे आढळून आले होते. याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर ते संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. ते संकेतस्थळ उघडतही नव्हते. त्याबाबत अधिक माहिती घेतली जाईल. डॉक्टरांनी ‘एमएमसी’च्या कोणत्याही ऑनलाइन सेवेचा वापर करण्यापूर्वी संकेतस्थळाचा पत्ता काळजीपूर्वक तपासावा.
- डॉ. विंकी रुघवानी, प्रशासक, एमएमसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.