
फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मनोज बाजपेयी बोलत होते.
Pune News : इंटरनेटच्या आव्हानावरही नाटक मात करेल - मनोज बाजपेयी
पुणे - नाटकासमोर चित्रपट, दूरचित्रवाणी, ओटीटी अशी अनेक आव्हाने आली. त्यावर मात करून नाटक जगले. आजही मी वेगवेगळ्या शहरांत जातो, तेथे अनेक नवीन नवीन नाट्यसंस्था तयार होत असल्याचे पाहतो आहे, युवा पिढी त्यात सक्रिय आहे. कारण इंटरनेटच्या माऱ्यामुळे आलेला थकवा त्यांना नाट्यकलेतून नवीन ऊर्जादायी अनुभव घेत दूर करायचा आहे. त्यामुळे कितीही आव्हाने आली, तरी नाटक त्यावर मात करून जिवंत राहील, असा विश्वास प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांनी बुधवारी व्यक्त केला.
फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, जयश्री फिरोदिया, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत कुलकर्णी, युवा दिग्दर्शक-अभिनेता निपुण धर्माधिकारी, युवा गायिका सावनी रवींद्र, रिअर अॅडमिरल आशिष कुलकर्णी, ‘एचसीएल’चे एचसीएल फाऊंडेशनचे विजय अय्यर, पियुष वानखडे आदी उपस्थित होते. यावेळी यंदाच्या फिरोदिया करंडक स्पर्धेत विविध विभागात पारितोषिके पटकावलेल्या विद्यार्थ्यांना बाजपेयी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
बाजपेयी म्हणाले, ‘नेपाळच्या सीमेपासून पाच-सात किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात, एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. मला अभिनेताच व्हायचे आहे, हे मी नवव्या वर्षीच ठरवले होते. मात्र तेथून दिल्ली आणि पुढे मुंबईपर्यंतचा प्रवास अवघड होता. मला त्याकाळी माझ्या सादरीकरणासाठी कोणताही मंच, कोणतीही स्पर्धा उपलब्ध नव्हती. आज तुम्हाला फिरोदिया करंडक स्पर्धेसारखा मंच उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात.’
‘या स्पर्धेतून दरवर्षी खूप उत्साह मिळतो, त्यामुळे मी अधिकधिक तरुण होतो आहे. हा केवळ कलेचा नाही, तर आयुष्यातील सगळ्या कौशल्यांचे शिक्षण देणारा रंगमंच आहे’, असे सूर्यकांत कुलकर्णी यांनी सांगितले. ‘मनोज बाजपेयी यांचे यश केवळ एका दिवसातील नाही. त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आणि तपश्चर्या आहे. युवा कलाकारांनी हे लक्षात घ्यावे’, असा सल्ला जयश्री फिरोदिया यांनी दिला. निपुण धर्माधिकारी, सावनी रवींद्र, आशिष कुलकर्णी यांनी ‘फिरोदिया’तील आठवणींना उजाळा दिला.
‘कलाकार कोणत्याही क्षेत्रात गेला तरी तो सगळ्यांपेक्षा वेगळा असतो. डॉक्टर असो, अधिकारी असो किंवा शिक्षक, तो कलाकार असेल, तर त्याच्यातील वेगळेपणामुळे तो लगेच उठून दिसतो. त्यामुळे शाळेत मुलांना किमान एकतरी कला शिकणे अनिवार्य करावे, यासाठी मी प्रयत्न करतो आहे.’
- मनोज बाजपेयी
‘हजरात... हजरात... हजरात’
मनोज बाजपेयी यांचे भाषण झाल्यानंतर ‘वो पुराने दिन’, हे गीत सादर करण्याची फर्माईश रसिकांनी केली. हे गीत न गुणगुणता त्यांनी केवळ त्याच्या ओळी म्हणून दाखवल्या. मात्र त्यानंतर ‘यात समाधान नाही वाटले’, असे म्हणत त्यांनीच पुन्हा संवाद म्हणायला सुरूवात केली. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील ‘हजरात... हजरात... हजरात’ या प्रसिद्ध संवादाला सुरूवात करताच प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. बाजपेयी यांच्या संवादातील प्रत्येक वाक्याला उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर केला.