esakal | पुणे: डीएसके कार प्रकरण; ४३ लाखांची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

DSK

पुणे: डीएसके कार प्रकरण; ४३ लाखांची फसवणूक

sakal_logo
By
सुनील गाडेकर

पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांची जप्त केलेली महागडी कार कमी किमतीत मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाकडून ४३ लाख रुपये उकळल्याप्रकरणी एका तोतया आयपीएस अधिकाऱ्यांसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने समर्थ पोलिस ठाण्याला दिले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी हा आदेश दिला.

हेही वाचा: अकरावी प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र देण्यास मुदतवाढ

उस्मान हाशमुददीन तांबोळी, अर्शद उस्मान तांबोळी, मन्सूर अब्दुल गफूर सय्यद (तिघे रा. पदमजी पार्क, भवानी पेठ), हमीद सय्यद आणि अहमद सय्यद ( दोघे रा. भवानी पेठ ) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्यात आला. याबाबत रौनक दिलीप ओसवाल (रा. पदमजी पार्क, भवानी पेठ) यांच्या वतीने अ‍ॅड.सेऊल शहा यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

ओसवाल आणि आरोपी तांबोळी व सय्यद एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ओसवाल यांना व्यावसायासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी आरोपींकडून २५ लाख रुपये घेतले होते. ते त्यांनी एका महिन्यातच परत केले होते. मात्र आरोपींनी त्यांच्या मर्सिडीज गाडीची मूळ कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर डीएसके यांच्या मालकीची पोर्शे ही दोन कोटी रुपये किमतीची गाडी ५० लाख रुपयात मिळवून देण्याची त्यांनी बतावणी केली.

हेही वाचा: महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या बदनामी प्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगीवर गुन्हा दाखल

यासाठी ओसवाल यांच्याकडून ४३ लाख रुपये वसूल केले. मात्र पैसै भरूनही त्यांना कार मिळाली नाही. या व्यवहारात सूर्यवंशी नावाच्या आयपीएस अधिकाऱ्याला मध्यस्ती करण्यात आले. परंतु, पुढे तो अधिकारी तोतया अधिकारी असल्याचे ओसवाल यांच्या लक्षात आले.

कारवाई न झाल्याने न्यायालयात धाव :

या प्रकरणात ओसवाल यांना मारहाण करून धमकावण्यात आल्याने त्यांनी समर्थ पोलिस ठाण्यात व पोलिस आयुक्तालयात तक्रार अर्ज दिला होता. मारहाण, अपहार, फसवणूक, धमकावणे आणि खंडणी यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. परंतु, कारवाई न झाल्याने त्यांनी शेवटी न्यायालयात धाव घेतल्याचे याचिकेत नमूद आहे.

loading image
go to top