esakal | Pune : दूर्वाही झाल्या दुर्लभ...
sakal

बोलून बातमी शोधा

durva

Pune : दूर्वाही झाल्या दुर्लभ...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातगाव पठार : गणपती बाप्पाला दूर्वा अत्यंत प्रिय असतात; दूर्वा अर्पण केल्याशिवाय गणपतीपूजन पूर्ण होत नाही, असे सांगितले जाते. मात्र आता ग्रामीण भागात सहजपणे दूर्वा मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. घराशेजारी वाढलेल्या गवतावर तणनाशके मारण्याचे प्रमाण वाढल्याने या गवताबरोबरच दूर्वादेखील जळून जात आहेत. त्यामुळे बाप्पाला दूर्वा वाहण्यासाठी त्यांची शोधाशोध करावी लागणार असल्याचे पेठ (ता. आंबेगाव) येथील बबनराव महाराज शिंदे यांनी सांगितले.

पूर्वी पावसाळा सुरू झाला की हरळ म्हणजे दूर्वांची उगवण सहजपणे होत होती. अगदी सर्वत्रच ही हरळ नजरेस पडत असे. मात्र अलीकडच्या काळात घराशेजारी उगवलेले गवत तणनाशक मारून नष्ट केले जाते. यावेळी तणनाशक मारताना ते हरळीवर देखील पडते. त्यामुळे हरळ देखील गवताबरोबर जळून जाते. त्यामुळे सहजच नजरेस पडणारी हरळ म्हणजेच दूर्वा आता मिळवण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे.

गणपतीचे पूजन करताना २१ दूर्वांच्या २१ जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण केला जातो. एका मान्यतेनुसार, विषम संख्येत गणपतीला दूर्वा वाहिल्या जातात. जसे की, ३, ५, ७, ९ अशा दूर्वांची जुडी. अशा प्रकारे दूर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो. मनापासून केलेली मनोकामना पूर्णत्वास जाते. विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा पूर्ण करतो अशी सर्व श्रद्धा आहे.

हेही वाचा: एकही लस विकत न घेता राज्याची जाहिरातबाजी

दूर्वांचे आरोग्यदायी महत्त्व

दूर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दूर्वा औषधी आहे. मानसिक शांतीसाठीही दूर्वा लाभकारक आहे. कर्करोगाच्या रुग्णांवरही दूर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

गणपतीच्या डोक्यावर दूर्वा वाहतात, यामागे एक आख्यायिका आहे. ऋषी-मुनी आणि देवता यांना अनलासुर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असुराला गिळून टाकले. यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दूर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दूर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिल्या. त्या वेळी अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. त्या वेळी, यापुढे मला दूर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाले होते. म्हणून गणपतीला दूर्वा वाहिल्या जातात.

- बबनराव महाराज ढमाले, पेठ, ता. आंबेगाव

loading image
go to top