esakal | ‘पीएमपी’मध्ये आता ई कॅबही! I Ecab Service
sakal

बोलून बातमी शोधा

Ecab Service

‘पीएमपी’मध्ये आता ई कॅबही!

sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ठरावीक अंतरासाठी प्रवाशांना इलेक्ट्रिक मोटारद्वारे (ई-कॅब) सेवा देण्याचे नियोजन पीएमपीने केले आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १०० ते २०० मोटारी पीएमपीच्या ताफ्यात दाखल होऊ शकतात. कंपन्यांच्या कॅब आणि रिक्षाच्या तुलनेत ही सेवा स्वस्त असेल, असा पीएमपीचा दावा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील परिवहन सेवेच्या माध्यमातून ई-कॅबद्वारे प्रवाशांना सेवा देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

विमानतळ, एसटी, रेल्वे स्थानक तसेच बाजारपेठेत जाण्यासाठी या कॅब प्रवाशांना उपलब्ध असतील. तसेच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त असेल, असा पीएमपीचा होरा आहे. पुणे दर्शन किंवा पिंपरी चिंचवड दर्शनही पीएमपीच्या या ई-कॅबच्या माध्यमातून प्रवाशांना उपलब्ध होऊ शकते. या बाबतचा आराखडा तयार करण्यात आला असून, पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. त्यात मंजुरी मिळाल्यावर या प्रस्तावाची अंमलबजावणी होऊ शकते, असे पीएमपीमधील सूत्रांनी स्पष्ट केले.

याबाबत पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या प्रस्तावाची प्रत ‘सकाळ’ला उपलब्ध झाली आहे.

प्रवाशांना घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याचा ई-कॅब सेवेचा उद्देश आहे. त्यातून खासगी वाहनांची संख्या कमी होईल आणि प्रवाशांसाठी प्रवासाचा वेळ कमी होईल, असाही पीएमपीचा होरा आहे.

हेही वाचा: इंदापूरात पाच वर्षांपासून रोज १५ गरिबांना अरुण राऊत देतात भोजन

६ लाख - पीएमपीचे रोजचे सरासरी प्रवासी

९८ लाख - पीएमपीचे रोजचे सरासरी उत्पन्न

११ लाख - कोरोनापूर्व काळातील रोजची प्रवासी संख्या

१.५ कोटी - कोरोनापूर्व काळातील रोजचे उत्पन्न

अशी होणार अंमलबजावणी

शिवाजीनगर, डेक्कन, स्वारगेट, पूलगेट, पुणे रेल्वे स्टेशन आणि शहराच्या मध्यभागातून या कॅब उपलब्ध होतील

पीएमपीच्या ९ डेपोंमध्ये चार्जिंगची सुविधा उपलब्ध होऊ शकते.

त्यातून या मोटारी चार्ज होतील

या मोटारी रोज किमान १५० किलोमीटर अंतर धावतील

महिलांसाठी पिंक कॅब स्वरूपात सेवा

बेस फेअरनंतर १० रुपये प्रति किलोमीटर या कॅबचे भाडे असेल

टाटा कंपनीची नेक्सन आणि ई-वेरिटो या मॉडेल्समार्फत कॅब उपलब्ध होईल.

स्वारगेट ते लोहगाव विमानतळ या

१३ किलोमीटरच्या अंतरासाठी कॅब सध्या २८० ते २९० रुपये आकारतात. मात्र, पीएमपीची ई-कॅब या अंतरासाठी १३० रुपये शुल्क आकारेल.

सार्वजनिक वाहतुकीद्वारे जास्तीत जास्त प्रवाशांची वाहतूक करण्याचे धोरण आहे. पीएमपीने बसची संख्या वाढवून प्रवासी वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

- महेश झगडे, माजी महापालिका आयुक्त

पीएमपीची ई-कॅब सेवा सुरू झाल्यास त्याचा प्रवाशांना फायदा होणार का, याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह व्हॉट्सअॅपवर कळवा... - ८४८४९७३६०२

loading image
go to top