बंडखोरीमुळे महायुती-आघाडीच्या डोकेदुखीत वाढ

बंडखोरीमुळे महायुती-आघाडीच्या डोकेदुखीत वाढ
Published on: 

पुणे, ता. ६ : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरीची लागण झाली. यामुळे दोन्ही मतदारसंघांत चुरस वाढली असून, शुक्रवारी (ता. ९) अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदीप ऊर्फ भैय्या माने यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली आहे. याच मतदारसंघात पक्षाकडून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची कन्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला. शिक्षक मतदारसंघात महायुतीमधील शिवसेनेतच बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्याने चिवटे यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी याच मतदारसंघातून शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांचे माजी स्वीय सहाय्यक सचिन सानप आणि शिवसेनेच्या शहर सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत यांनीही अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून शिक्षक मतदारसंघासाठी विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनीही अर्ज दाखल केला.
पदवीधर मतदारसंघासाठी अखेरच्या दिवशी ५४ अर्ज दाखल झाले. त्यामुळे मतदारसंघात आतापर्यंत ८७ अर्ज दाखल झाले आहेत. शिक्षक मतदारसंघात मंगळवारी २९ अर्ज दाखल झाले असून, एकूण अर्जांची संख्या ६७ वर गेली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरी झाल्यामुळे ती थांबविण्यासाठीचे प्रयत्न पक्ष पातळीवर सुरू झाले. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
पुणे विभागाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपुष्टात आली. पुणे पदवीधर मतदारसंघात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. पदवीधरसाठी भाजपकडून डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे उमेदवार आहेत. या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षदा देशमुख-जाधव यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. मात्र, मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रदीप माने यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरला. यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित होते.

बंडखोरी रोखण्याचे आव्हान :
शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आश्‍विनी कदम यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. याच मतदारसंघात शिवसेनेतही बंडखोरी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी शिक्षक मतदारसंघातून अर्ज दाखल केला. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा पाठिंबा असल्याचा दावा करत सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत यांनीही या मतदारसंघात अर्ज दाखल केला. यापूर्वी उद्योगमंत्री सामंत यांचे स्वीय सहायक सचिन सानप यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील मित्रपक्षांकडून झालेली बंडखोरी रोखण्याचे आव्हान भाजपपुढे असणार आहे. अशीच काहीशी परिस्थिती पदवीधर मतदारसंघातही निर्माण झाली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात शिंदे सेनेच्या सचिन बांगर, राणी सुजीत खुर्चे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत भाजप उमेदवारापुढे अडचण निर्माण केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बंडखोरीची लागण झाली आहे. या पक्षाचे शिवाजी खंडेकर यांनी पदवीधरमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाऊसाहेब आंधळकर यांनीदेखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीत रंगत आणली आहे.


‘‘महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्यात आले आहेत. देशात शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्‍न गंभीर झाले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रश्‍न घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. सर्व घटक पक्षांची चर्चा करून समन्वय साधून उमेदवारी अंतिम केली जाईल. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.’’
- शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

Marathi News Esakal
www.esakal.com